मुंबई - वांद्रे रेक्लेमेशन येथील २४ एकर भूखंडाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या भूखंडाचा पुनर्विकास करण्यासाठी अदानी रीअल्टी कंपनीला नुकतेच स्वीकृती पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच या भूखंडाच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे.
वांद्रे रेक्लेमेशन येथे एमएसआरडीसीची २९ एकर जागा आहे. सद्य:स्थितीत यातील ७ एकर जागेवर एमएसआरडीसीचे मुख्यालय आहे, तर अन्य जागेवर कास्टिंग यार्ड उभारले आहे. यातील चार एकर जागेवर स्मशानभूमी, दवाखाना आदींसाठी आरक्षण आहे, तर एमएसआरडीसीने यातील २४ एकर भूखंडाचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा मागविली होती. त्यासाठी मागितलेल्या निविदेत अदानी रीअल्टीची निविदा सरस ठरली होती. वांद्रे रेक्लेमेशन भूखंडाच्या निविदेला एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली होती. त्यानंतर आता कंत्राटदाला स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या भूखंडाच्या पुनर्विकासाला सुरुवात केली जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यालय तात्पुरते होणार स्थलांतरित पुनर्विकासामुळे एमएसआरडीसीचे कार्यालय तात्पुरते स्थलांतरित करावे लागेल. कंत्राटदाराला पुनर्विकासानंतर एमएसआरडीसीला त्याच जागी जवळपास ४५ हजार चौरस फुटांचे कार्यालयही उभारून द्यावे लागणार आहे. कार्यालय स्थालांतरण करावे लागणार असल्याने कार्यालयाच्या मासिक भाड्यापोटी २ कोटी रुपये देण्यात येतील. हा पुनर्विकास प्रकल्प पुढील १० वर्षांत कंत्राटदाराला मार्गी लावावा लागेल, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.एमएसआरडीसीला ८ हजार कोटींचा नफा या पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन केली जाणार आहे. या जागेच्या पुनर्विकासानंतर एमएसआरडीसीला किमान ८ हजार कोटी किंवा खर्च वगळून कंत्राटदाराला मिळणाऱ्या “नफ्यातील २३.१५ टक्के नफा यातील जी रक्कम अधिक असेल ती मिळणार आहे.