मुंबई ढगाळ राहणार, मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:48 AM2018-05-29T06:48:18+5:302018-05-29T06:48:18+5:30
मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचा अंदाज या आधीच वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईचे वातावरण यापुढे ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये दरवर्षी १ जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच तो केरळात दाखल झालाय. केरळात दाखल झाल्यानंतर पुढील २४ तासांत मान्सूनची वाटचाल दक्षीण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या खाडीच्या परिसरात होतो.
कोकणातही पूर्व मोसमी पावसाने सलामी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस झाला, तर जिल्ह्यातील अन्य भागांत ढगाळ वातावरण होते. येत्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदास पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ ते ४८ तासांत महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होऊन तापमानात घट होईल. द. महाराष्ट्रात ३० मेपासून मोसमी पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा आहे.