Join us

पावसाळापूर्व कामे झाल्याने मुंबईकरांना मिळणार दिलासा; उद्धव ठाकरे आणि महापौरांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 2:21 AM

भायखळा येथील महापौर निवासात सोमवारी मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : पावसाळा मुंबईकरांसाठी तापदायकच ठरतो़ कुठे पाणी तुंबते, तर खड्ड्यांनी शहराची चाळण होते़ मात्र या पावासाळ्यात महापालिकेने सर्व कामे चोख केली आहेत़ त्यामुळे यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा ठरेल, अशी ग्वाही खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे़ या दिग्गजांनी केलेला हा दावा प्रत्यक्षात खरा ठरतो की नाही हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

भायखळा येथील महापौर निवासात सोमवारी मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालक मंत्री सुभाष देसाई, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त ए. एल. जºहाड, उप आयुक्त सुनील धामणे, संचालक विनोद चिठोरे आदी उपस्थित होते.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यात अडचणी आल्यास, मुंबई पुराच्या पाण्याखाली गेल्यास सातत्याने मुंबई महापालिकेवर अपयशाचे खापर फोडले जाते. प्रत्यक्षात मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, सार्वजनिक बांधकाम विभागासह रेल्वेचीही ठिकठिकाणी कामे सुरू असतात.

परंतु सर्वच प्राधिकरणे आपआपली जबाबदारी झटकून महापालिकेकडे बोट दाखवितात. परिणामी, महापालिका टीकेची धनी होते. या कारणात्सव केवळ महापालिकेवरच दोषारोष ठेवण्याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे,

या प्रमुख मुद्द्यावर मान्सूनपूर्व बैठकीत जोर देण्यात आला.पालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व आस्थापनांचे म्हणजेच रुग्णालये, शाळा, विभाग कार्यालये यांचे दिशादर्शक फलक नागरिकांना आपत्कालीनप्रसंगी उपयोगी पडावेत, म्हणून प्रदर्शनी भागात ते लावावेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सेवा देणाºया विविध संस्था (प्राधिकरणे) असल्याने अडचणीवेळी फक्त मुंबई महापालिकेवरच दोषारोप ठेवण्यात येतात. तरी मुंबईसाठी एकच प्राधिकरण असावे या प्रमुख मुद्द्यावर जोर देण्यात आला.महापालिका व इतर प्राधिकरणांनी समन्वय ठेवावा. महापालिकेने मान्सूनपूर्व कामे केली असून मुंबईकरांना येता पावसाळा दिलासा देणारा असेल. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरावा याकरिता महापालिकेसह राज्य व केंद्र शासनाच्या प्राधिकरणांनी समन्वय ठेवत कामे केली आहेत. परिणामी, हा पावसाळा मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरेल. - विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

मुंबईच्या पूर्व-पश्चिम दिशांना जोडणाºया उड्डाणपुलांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून उपनगरातील नालेसफाईबाबत विशेष प्राधान्य द्यावे. - सुभाष देसाई, पालकमंत्री, मुंबई शहर

महापालिका प्रशासन येत्या पावसाळ्यासाठी सर्व यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे. विविध प्रश्नांबाबत विविध प्राधिकरणांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. - प्रवीण परदेशी, आयुक्त, मुंबई महापालिका

पावसाळ्यात पाणी साचण्याची २२५ ठिकाणे व त्यापैकी ३५ संवेदनशील ठिकाणांची वाहतूक पोलिसांच्या मदतीने योग्य त्या पर्यायी उपाययोजना कराव्यात. सोशल मीडियाद्वारे येणाºया तक्रारींबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी पालिकेने कार्यशाळाही कार्यान्वित करावी.- आदित्य ठाकरे, युवा सेनाध्यक्ष

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिका