मुंबई : देवभूमीमध्ये ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे केरळवासियांवर मोठे संकट ओढवले आहे. केरळवासियांसाठी देशभरासह राज्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त भागात ओले खाद्य पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे मंडळाने फरसाण, चकली, जास्त दिवस टिकणारी फळे, ड्रायफ्रूट आणि बिस्किटे पाठविली आहेत, तसेच १,८०० सॅनिटरी नॅपकिनसह मोबाइल चार्ज करण्यासाठी पॉवर बँकही पुरविण्यात आल्याची माहिती पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.मालाड पूर्वेकडील निर्मला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्यांच्या मदतीने कपडे, ड्रायफ्रूटस्, पाण्याच्या बाटल्या, चटई इत्यादी वस्तू पूरग्रस्तांसाठी जमा केल्या आहेत, तसेच आर्थिक मदत म्हणून रस्त्यावरील दुकाने, फेरीवाल्यांकडूनही पैसे गोळा केले. आतापर्यंत ११ हजार ६०१ रुपये जमा झाले असून, ते केरळला पाठविण्यात आले आहेत, तर म्यूझ संस्थेकडून रविवारी १५ टन गृहोपयोगी साहित्य पाठविण्यात आले आहे. वायुसेनेच्या वतीने हे साहित्य तिरुअनंतपूरमला पाठविण्यात आले. तर, मंगळवारी नेत्रावती एक्स्प्रेसमधून दोन टन साहित्य वायनाड येथे पाठविल्याची माहिती म्यूझ संस्थेचे संचालक निशांत बंगेरा यांनी दिली.रिलायन्सकडून २१ कोटीरिलायन्स फाउंडेशनने केरळवासियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे सहाय्यता निधी म्हणून २१ कोटी रुपयांची मदत सुपुर्द केली आहे, तसेच ५० कोटी रुपयांचे साहित्य मदत स्वरूपात देण्यात आले आहे.राष्ट्रवादी ट्रस्टतर्फे एक कोटीचा धनादेशमुंबई : केरळ राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनूसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून केरळ राज्याला मदत म्हणून एक कोटीचा धनादेश देत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या आणि पक्षाच्या माध्यमातून केरळ राज्यासाठी लागणारी औषधे आणि साहित्याची मदतही देण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. केंद्राची मदत तोकडी पडत असून त्यात वाढ करावी आणि त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. पाटील यांनी एक कोटीचा धनादेश केरळ येथील पक्षाचे सरचिटणीस सलीम पी. मॅथ्यू यांच्याकडे सोपविला. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते.मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही मदतमध्य रेल्वेमध्ये सध्या ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या आॅगस्ट महिन्याच्या वेतनातून किमान ५०० ते कमाल ३ हजार रुपये वेगळे काढून, तो निधी केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे. केरळमधील नागरिकांना सध्या जगभरातून मदत केली जात आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केरळला सर्व शक्य ती मदत करण्याची यापूर्वीच घोषणा केली होती. देशाच्या विविध भागांतून रेल्वे, राज्य सरकार, महामंडळे व सरकारी यंत्रणांद्वारे केरळला पाठविण्यात येणाºया वस्तूंची वाहतूक रेल्वेतर्फे विनामूल्य करण्यात येत आहे. केरळसाठी १४ वॅगनच्या माध्यमातून पिण्याचे पाणी व २७ हजार किलो मदत सामुग्री पाठविण्यात आली आहे. त्यानंतर, आता मध्य रेल्वेच्या कर्मचाºयांच्या वेतनातूनही केरळला मदत करण्यात येणार आहे. मात्र, नेमकी किती मदत दिली जाईल, याची माहिती ३१ आॅगस्टला देण्यात येईल.
केरळवासियांसाठी मुंबई सरसावली; गणेशोत्सव मंडळ, विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 6:12 AM