मुंबई : जुहू येथील खासगी रुग्णालयात रविवारी ३७ वे अवयवदान पार पडले. रविवारी ५१ वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे तिघांना नवजीवन मिळाले. मुंबईतील हे ३७वे अवयवदान आहे.रविवारी सकाळी चक्कर येऊन कोसळल्याने अंधेरीतील ५१ वर्षीय जितेन मेहता यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. याविषयी माहिती देताना त्यांची बहीण राजश्री यांनी सांगितले की, भावाची अवयवदानाची इच्छा असल्याने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचे यकृत, किडनी आणि नेत्रपटल दान केले.जुहू येथील खासगी रुग्णालयाचे प्रत्यारोपण समन्वयक समीर विजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता यांच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे तिघांना नवजीवन मिळाले. परंतु, आजही अवयवदानाची कृतिशील अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत गरजेची आहे.
मुंबईतील अवयवदानामुळे मिळाले तिघांना नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:33 AM