Mumbai: तलाव क्षेत्रातील पावसामुळे दिलासा
By जयंत होवाळ | Published: June 24, 2024 06:51 PM2024-06-24T18:51:08+5:302024-06-24T18:51:30+5:30
Mumbai News: मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठा हळूहळू वाढत आहे. ही वाढ फार मोठी नसली तरी त्यामुळे पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होत आहे.
- जयंत होवाळ
मुंबई - मुंबईत पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने धरणातील पाणी साठा हळूहळू वाढत आहे. ही वाढ फार मोठी नसली तरी त्यामुळे पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होत आहे.
जून महिना संपत आला तरी मुंबईत पावसाचा जोर काही वाढलेला नाही. अजूनही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचेही मोठ्या प्रमाणवर बाष्पीभवन झाले होते. एकूणच धरणातील पाणी साठा कमालीचा आटला होता. पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाने फार गती घेतलेली नाही. मात्र तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आणि धरणे ही प्रामुख्याने मुंबई बाहेर आहेत. त्या भागात पाऊस चांगला होत आहे. परिणामी धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. धरणात दररोज अडीच ते साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होत आहे.
२१ ते २४ जून या चार दिवसात मुंबई शहराला सुमारे १४ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा करण्यात आला. याचाच अर्थ गेल्या चार दिवसात १३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाण्यामध्ये वाढ झाली. परंतु ही वाढ समाधानकारक नसून तलाव क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तरच मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा संकट दूर होईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत १४४ ते ३२४ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आजूबाजूचे ओढे व छोट्या नदी वाहू लागल्यामुळे हे पाणी तलाव क्षेत्रात जमा होत आहे. त्यामुळे दररोज पाणीसाठ्यात अडीच ते तीन हजार दशलक्ष लिटरने वाढ होत आहे. त्यामुळे तलावक्षेत्रात जोरदार पाऊस होण्याची गरज आहे.
तलावक्षेत्रातील पाऊस
अप्पर वैतरणा - १४४ मिमी
मोडक सागर - १७३ मिमी
तानसा - २०८ मिमी
मध्य वैतरणा - १९३ मिमी
भातसा - २२२ मिमी
विहार - २९२ मिमी
तुळशी - ३२४ मिमी