Join us  

Mumbai Restriction: लग्न समारंभ, मेळावे घेताय? मुंबई पोलिसांची नियमावली वाचा; १६ डिसेंबरपासून शहरात लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 9:44 AM

कोरोना आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू केले आहेत.

मुंबई – कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. भारतातही ओमायक्रॉनचे व्हेरिएंट दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळल्याने मुंबई पोलिसांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यात पोलिसांकडून कोविड नियमांचे काटेकोट पालन करण्याचं आवाहन सर्व मुंबईकरांना केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने निर्बंध आखून दिले होते. त्याचे पालन होतंय की नाही हे मुंबई पोलिसांकडून तपासलं जाणार आहे.

मुंबई पोलिसांच्या परिपत्रकात काय म्हटलंय?

सर्व व्यक्ती ज्या एखाद्या कार्यक्रमाशी, सेवेशी निगडीत आहेत. आयोजक, सहभागी असणारे, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे पूर्णपणे लसीकरण असायला हवे.

कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेलं हवं. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.

मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी

महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.

कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.

मुंबई महापालिकेचंही आवाहन

मुंबईतील सुमारे पाच लाख नागरिकांनी दुसऱ्या डोसची मुदत चुकवली असल्याचे समोर आले आहे. दोन्ही डोस घेतल्यास कोविडचा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे दुकान, मॉल आदी ठिकाणी दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच बेस्ट बसमध्ये प्रवेश देण्याचा नियम करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रम मुंबईची दुसरी जीवनवाहिनी आहे. बेस्ट बसमधून दररोज २८ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत प्रत्येक बस प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रत्येकाचे प्रमाणपत्र तपासणे बस वाहकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यामुंबई पोलीस