Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 09:03 AM2024-06-05T09:03:17+5:302024-06-05T09:04:01+5:30
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : २०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपप्रणित एनडीएच्या पारड्यात टाकल्या होत्या.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबई : केंद्रात ज्या पक्षाची किंवा आघाडीची सत्ता येते सर्वसाधारणपणे त्यालाच निवडणुकीत मुंबई साथ देते, असा इतिहास आहे. त्याला अपवाद फक्त १९८० ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर ही २०२४ची निवडणूक. केंद्रात भाजपप्रणित एनडीए २९२च्या आसपास जागा मिळवून पुन्हा सत्तेत येत असताना मुंबईकरांनी मात्र काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ म्हणजेच महाविकास आघाडीला साथ दिल्याचे दिसून येते.
२०१९ आणि २०१४च्या निवडणुकीत मुंबईकरांनी सहाही जागांवर केंद्रात सत्ता आलेल्या भाजपप्रणित एनडीएच्या पारड्यात टाकल्या होत्या. त्या आधी २००९मध्येही केंद्रात सत्तेत आलेल्या ‘यूपीए’चे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. २००४मध्ये यूपीएतील काँग्रेसचे पाच उमेदवार मुंबईकरांनी निवडून दिले होते. १९८०चा अपवाद वगळता हा ट्रेंड मागील सर्वच निवडणुकांमध्ये दिसून आला होता.
शहराचे कॉस्मोपॉलिटन स्वरूप
कॉस्मोपॉलिटन स्वरूप असलेल्या मुंबईत देशभरातून मोठ्या संख्येने लोक स्थलांतरित होत असतात. ते या महानगरात रोजीरोटीसाठी येत असले तरी त्यांच्या गावाशी त्याची नाळ जुळलेली असते. त्यामुळे मुंबईत देशातील राजकीय वारे नेमक्या कुठल्या दिशेने वाहत आहेत, त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसते. २०२४ची निवडणूक मात्र याला अपवाद ठरली आहे.
१९७१ - सहाही जागा काँग्रेसकडे - केंद्रात सत्ता काँग्रेसची
१९७७ - सहाही जागा जनता पक्षाकडे - केंद्रात सत्ता जनता पक्षाची
१९८० - जनता पक्षाकडे ५, काँग्रेसकडे १ जागा - केंद्रात सत्ता काँग्रेसची (अपवाद)
१९८४ - काँग्रेसकडे ५ आणि १ अपक्ष दत्ता सामंत - केंद्रात सत्ता काँग्रेसची
१९८९ - शिवसेना-भाजपकडे ४ आणि काँग्रेसकडे २-केंद्रात सत्ता जनता दल आघाडीची
१९९१ - काँग्रेसकडे ४ आणि शिवसेना-भाजपकडे २ - केंद्रात सत्ता काँग्रेसची
१९९६ - सहाही जागा शिवसेना-भाजपला - केंद्रात सत्ता एनडीएची
१९९८ - काँग्रेसला ३, शिवसेना-भाजपला ३ - केंद्रात सरकार वाजपेयींचे
१९९९ - पाच जागा शिवसेना-भाजपला, एक काँग्रेसला - केंद्रात सत्ता भाजप आघाडीची
२००४ - काँग्रेसला पाच, शिवसेनेला १ - केंद्रात सत्ता यूपीएची
२००९ - सहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला - केंद्रात सत्ता यूपीएची