Join us

मुंबई पुन्हा गारठली

By admin | Published: February 07, 2017 5:14 AM

मुंबईचे किमान तापमान सोमवारी १७.२ अंश नोंदवण्यात आले असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घटलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे

मुंबई : मुंबईचे किमान तापमान सोमवारी १७.२ अंश नोंदवण्यात आले असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घटलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईचे किमान तापमान १६ अंशाच्या आसपास असल्याने मुंबईचे वातावरण गार होते, तर दोन आठवड्यांत वाढलेल्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांना काहीशा ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता पुन्हा किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकर सुखद गारव्याचा अनुभव घेत आहेत.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबईच्या किमान तापमानात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घट नोंदवण्यात आली असून, कमी झालेल्या तापमानामुळे वातावरण गार झाले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणच्या किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली असून, हे तापमान आठवडाभर कायम राहील. तर येत्या ४८ तासांसाठी मुंबईचे किमान तापमान १६ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवल्याने मुंबईतील हुडहुडी कायम राहणार असल्याचे चित्र तूर्तास आहे. (प्रतिनिधी)