मुंबई पुन्हा गारठली; किमान तापमान १५ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 05:09 AM2019-01-25T05:09:08+5:302019-01-25T05:09:15+5:30
उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने मुंबईसह राज्यातील शहरांच्या किमान तापमानात पुन्हा एकदा घट नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने मुंबईसह राज्यातील शहरांच्या किमान तापमानात पुन्हा एकदा घट नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या किमान तापमानात चांगलीच घट नोंदविण्यात आली असून, गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५ तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ९.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
किमान तापमान कमी झाल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा गारव्याची अनुभूती घेता येत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २५ जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २६ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २७ जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २८ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.