मुंबईच्या रिक्षाचालकाची साताऱ्यामध्ये हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 05:34 AM2019-08-07T05:34:19+5:302019-08-07T05:34:27+5:30

२० दिवसांनी गुन्ह्याची उकल; मांडूळ तस्करीत पैशांच्या वादातून मित्रांनीच काढला काटा

Mumbai rickshaw puller killed in Satara | मुंबईच्या रिक्षाचालकाची साताऱ्यामध्ये हत्या

मुंबईच्या रिक्षाचालकाची साताऱ्यामध्ये हत्या

Next

मुंबई : बेपत्ता रिक्षाचालकाची मांडूळ तस्करीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून सहकाऱ्यांनीच हत्या केल्याचे तपासात उघड झाले. घाटकोपर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत मुख्य सूत्रधार प्रदीप सुर्वेसह पाच जणांना सोमवारी अटक केली.

उदयभान रामप्रसाद पाल (४७) असे हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो घाटकोपरच्या अशोकनगर परिसरात वास्तव्यास होता. १७ तारखेला कामानिमित्त तो सातारा येथे गेला होता. मात्र, त्यानंतर त्याचा संपर्कच तुटल्याने पत्नीने २३ जून रोजी घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हरविल्याबाबत तक्रार नोंद केली. मोबाइल सीडीआरवरून तपास सुरू केला. तपासात पाल हा मांडूळ तस्करीत सक्रिय असल्याची माहिती पथकाच्या हाती लागली.

पुढे तपासात कराडचा रहिवासी असलेला प्रदीप शंकर सुर्वे (४७) याच्याकडून मांडुळासाठी पालने २१ लाख रुपये घेतले होते. मांडूळ मिळाल्यानंतर त्यासाठी १ कोटी रुपयांचे ग्राहक मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापैकी काहीही न करता मांडूळ विक्रीच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक केली. त्यामुळे सुर्वेचा पालवर राग होता. याच रागातून सुर्वेने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे १८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास त्याने पालला कोयनानगर वसाहतीजवळ बोलावून घेतले. तेथे सुर्वेने मित्र विनोद शुद्रिक (३०), सुरेश सोनावणे (३३), अक्षय अवघडे (२३) यांच्या मदतीने पालची हत्या केली. मृतदेह कराड-चिपळूणदरम्यान कुंभार्ली घाटातील दरीत फेकल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सुर्वे, सोनावणे, अवघडे, शुद्रिकसह गोवंडीतील वाहनचालक कलीम शब्बीर अहमद कुरेशी (३५) यांना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी त्यांचा ताबा कराड पोलिसांना दिला.

रत्नागिरीतील मृतदेह घेतला ताब्यात
रत्नागिरीच्या आलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात २५ जुलै रोजी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासात तो मृतदेह उदयभानचा असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

Web Title: Mumbai rickshaw puller killed in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून