Join us

मुंबईची रिक्षा साहेबांच्या इंग्लंडमध्ये! यॉर्क शहरातील लोकांना पडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 6:38 AM

इंग्लंडमधील यॉर्क शहरातील रस्त्यावर तीन चाकी रिक्षा धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका मुंबईकराने ही रिक्षा तिथे नेली असून तेथील लोकांना त्यातून तो शहराची टूर घडवून आणतोय.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तीनचाकांच्या रिक्षेचे भारतीयांना कोणतेही अप्रूप नाही. ऑफिसला जायला उशीर झाला की हमखास रिक्षाला हात दाखवून झटक्यात ऑफिस गाठता येते. छोट्या अंतरावरच्या प्रवासासाठी सहज उपलब्ध असलेेले हे रिक्षा नामक वाहन थेट गोऱ्या साहेबांच्या इंग्लंडमधील गुळगुळीत रस्त्यांवर धावत असलेले पाहायला मिळाले. गोऱ्या साहेबालाही रिक्षाची भुरळ पडली असून तेही कौतुकाने रिक्षेला न्याहाळत आहेत. 

त्याचे झाले असे की, इंग्लंडमधील यॉर्क शहरातील रस्त्यावर तीन चाकी रिक्षा धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका मुंबईकराने ही रिक्षा तिथे नेली असून तेथील लोकांना त्यातून तो शहराची टूर घडवून आणतोय. यॉर्क विद्यापीठात शिकत असलेल्या मुंबईकर विद्यार्थ्याला ही रिक्षा दिसली आणि घरचे कोणतरी भेटल्याचा आनंद त्याला झाला. मग पैशांची घासाघीस न करता तो थेट त्या रिक्षात बसून परवा आपल्या कॉलेजला गेला. तो मुंबईचा असल्याचे समजल्यावर रिक्षाचालकालाही आनंद झाला. मग रिक्षात हिंदी गाणी लागली अन् हिंदीच्या गाण्यांच्या थिरकाव्यातच ही रिक्षा थेट त्या विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या आवारात शिरली. 

काळ्या-पिवळ्या रंगाचे आणि तीनचाकांवर चालणारे वाहन कॉलेजात आल्याचे पाहून अर्थातच कॉलेजमध्ये तो विद्यार्थी आणि त्याचा रिक्षा प्रवास त्या दिवशी चर्चेचा विषय ठरला होता. या विद्यार्थ्याने या रिक्षाचा फोटो आणि स्वतःचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रंजक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

टॅग्स :मुंबईइंग्लंड