मुंबईत गारठा वाढला; किमान तापमान १७ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:59 AM2018-12-10T05:59:26+5:302018-12-10T06:00:07+5:30
सातत्याने वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाढणारा उकाडा आणि त्यामुळे तापदायक ऊन, घामाच्या धारांनी त्रस्त मुंबईकरांना आता किमान तापमानात घट होत असल्याने दिलासा मिळत आहे.
मुंबई : सातत्याने वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाढणारा उकाडा आणि त्यामुळे तापदायक ऊन, घामाच्या धारांनी त्रस्त मुंबईकरांना आता किमान तापमानात घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असून, शनिवारी १८ अंश नोंदविण्यात आलेले किमान तापमान रविवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे रात्रीच्या हवेतील गारवा वाढला असून, मुंबईकरांना आता कुठे हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीच्या हवेतील गारठा वाढला आहे. मध्यरात्री बारा वाजता मुंबईचे कमाल तापमान २७ अंश नोंदविण्यात येत असून, हेच कमाल तापमान पहाटे २५ अंश नोंदविण्यात येत असले तरी रविवारी १७ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी रात्री आणि पहाटे वातावरणातील गारठा वाढल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव येत आहे.
मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. १० आणि १२ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १३ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे
राहील. १० आणि १२ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान
अनुक्रमे ३१, १७ अंशांच्या आसपास राहील.
स्वेटर विक्रेत्यांची गर्दी
थंडी वाढत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर स्वेटर विक्रेत्यांची गर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषत: स्टेशन परिसर आणि मध्य मुंबई म्हणजे लालबाग परळ येथे स्वेटर विक्रेते अधिक प्रमाणात निदर्शनास येत असून, तापमानात जसजशी घट होईल; तशीतशी थंडी आणखी वाढणार आहे.
प्रत्यक्षात किमान तापमानात घट नोंदविण्यात आली की थंडी वाढते; असा सर्वसाधारण समज असतो. प्रत्यक्षात तसे नसते. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार, जेव्हा कमाल तापमानात घट नोंदविण्यात येते तेव्हा थंडी वाढते.
मध्यरात्री बारा वाजता मुंबईचे कमाल तापमान २७ अंश नोंदविण्यात येत असून, हेच कमाल तापमान पहाटे २५ अंश नोंदविण्यात येत असले तरी रविवारी १७ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.