मुंबईतील नद्या पुनर्जीवित करताय का मारताय? काँक्रीटीकरणामुळे वस्त्यांमध्ये पुराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:46 IST2024-12-17T15:44:35+5:302024-12-17T15:46:17+5:30
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी महापालिकेकडून नद्यांमध्ये एसटीपी प्लांटसह (सांडपाणी प्रकल्प) नदीच्या किनारी सिमेंट काँक्रीटच्या भिंती बांधण्यात येत आहेत.

मुंबईतील नद्या पुनर्जीवित करताय का मारताय? काँक्रीटीकरणामुळे वस्त्यांमध्ये पुराचा धोका
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मृत नद्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी महापालिकेकडून नद्यांमध्ये एसटीपी प्लांटसह (सांडपाणी प्रकल्प) नदीच्या किनारी सिमेंट काँक्रीटच्या भिंती बांधण्यात येत आहेत. मात्र, या काँक्रीटीकरणामुळे नद्या जिवंत होणार नाहीत, तर त्यामुळे लगतच्या वस्त्यांना पुराच्या पाण्याचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे नद्यांचे काँक्रीटीकरण करण्याऐवजी पर्यावरणात्मक दृष्टिकोन समोर ठेवून नदीला पुन्हा जिवंत केले जावे, याकडे पर्यावरण अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर, पोयसर, ओशिवर (वालभाट) या नद्या वाहत असून पूर्व-पश्चिम उपनगरासह शहातून मिठी नदी वाहत आहे. नद्यांचे नाले झाले असून नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासह मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी २६ जुलैच्या पुरानंतर मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून दहिसर, पोयसर नद्यांवरही कामे सुरू झाली. मात्र, या कामाला पर्यावरण अभ्यासरकांनी विरोध केला आहे.
नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणाऱ्या नाल्यांबाबत कोणीच काही बोलत नाही. नाल्यांना स्वच्छ केले, तर नद्यांमध्ये प्रदूषित पाणी येणार नाही. हे काम करण्याबाबतचे प्रस्ताव तयार झाले आणि नाले साफ, स्वच्छ झाले तर नद्या प्रदूषित होणार नाहीत. नद्यांमध्ये काम करण्याऐवजी लगत काम केले तर पूर येणार नाहीत.
- गोपाल झवेरी, रिव्हर मॅन
नद्यांलगत असणाऱ्या तबेल्यांतून शेण नद्यांत सोडले जात आहे. हे थांबले पाहिजे. तबेल्यांमध्ये शेणावर प्रक्रिया करुन ते वापरले गेले तर नद्या प्रदूषित होणार नाहीत. शिवाय नद्यांचे काँक्रीटीकरण होता कामा नये. असे झाले तर पुराचा धोका कमी होण्याऐवजी वाढत जाईल.
- पंकज त्रिवेदी, पर्यावरण अभ्यासक
नदीकिनारी दगडी भिंत हवी
१. दहिसरमध्ये पूर्व आणि पश्चिमेला गेल्या चार वर्षात केवळ दहिसर नदीमध्ये एसटीपी प्लाटंच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. या कामाचा वेग कमी असून काँक्रीटीकरणाचा भरणा आहे.
२. नद्यांच्या आत नको, तर नद्यांलगत एसटीपी प्लांट बांधायला हवेत. नद्यांच्या दोन्ही किनारी दगडी भिंती (गेबेन वॉल) हव्यात.
३. नदीत एसटीपी प्लांट बांधले तर पूर आल्यावर पाणी बाहेर येईल. प्रवाह बदलेल आणि लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरेल