मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावरुन विधानसभेत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी आज सरकारला घेरलं. मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामात मनपा अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई, कंत्राटदारांसोबतचे लागेबांधे आणि घोटाळे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विषय आज विधानसभेत मांडले. मुंबईत ठिकठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्यामुळे मुंबईकरांचे होणारे हाल यावर आमदारांनी मंत्र्यांचं लक्ष वेधलं. तसेच विविध ठिकाणी कंत्राटदारांकडून होणाऱ्या फसवणुकीचीही प्रकरणं विधानभवनात मांडली. यावेळी सरकारकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांवर बोट ठेवत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. "अनेक ठिकाणी रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामं झाली. यासंदर्भात माध्यमांनी आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग येते हे अत्यंत संतापजनक आहे. जी यंत्रणा करदात्यांच्या पैशातून निर्माण केली आहे. ती यंत्रणा काहीच काम करत नव्हती. २९ अभियंत्यांना ताकीद दिल्याचं उत्तर आम्हाला दिलं गेलं. पण नुसती ताकीद देऊन उपयोग नाही. त्यांच्यावर काय कारवाई करणार हे सांगितलं गेलं पाहिजे", असं अतुल भातखळकर म्हणाले.
मुंबईतील आमदार रस्त्यांच्या मुद्द्यावरुन भडकले, पाहा व्हिडिओ...
अतुल भातखळकर यांच्या पाठोपाठ आमदार अमित साटम, अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अमिन पटेल, योगेश सागर, मुरजी पटेल यांनीही मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या मुद्द्यावरुन मंत्री उदय सामंत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उदय सामंत यांनी यावेळी प्रत्येकाला उत्तरंही दिली. त्यासोबतच आमदारांनी केलेल्या आरोपांची माहिती घेतली जाईल असंही आश्वासन दिलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांच्या मतदारसंघातील उदाहरण देत रखडलेल्या कामाची माहिती मंत्र्यांना करुन दिली आणि प्रश्नाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं. मुंबईतील बऱ्याच आमदारांनी काँक्रीटीकरणाच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यामुळे अखेर मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सर्व आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं आश्वासन दिलं. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांसोबत बैठक घेण्याची सूचना केली.