Join us

आमचे सरकार आल्यावर मुंबईचे लुटारू जेलमध्ये जातील; आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 6:48 AM

हनुमानाचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात केलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे हनुमान चालीसामुळे भूतपिशाच्च दूर होते त्याप्रमाणे आपल्याला खोके सरकारला पळवून लावायचा निर्धार करायचा आहे असे सांगत भाषणाला सुरुवात केली.

मुंबई : महापालिकेमध्ये गेल्या वर्षभरापासून चालत असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या फायली तयार आहेत. आमचे सरकार येताच मुंबईच्या या लुटारूंना आम्ही जेलमध्ये टाकू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महापालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चासमोर बोलताना दिला. मुंबई महापालिकेतील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मुंबई महापालिकेवरील या धडक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाऊस असतानाही शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठी गर्दी केली होती. 

हनुमानाचे दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात केलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्याप्रमाणे हनुमान चालीसामुळे भूतपिशाच्च दूर होते त्याप्रमाणे आपल्याला खोके सरकारला पळवून लावायचा निर्धार करायचा आहे असे सांगत भाषणाला सुरुवात केली. मुंबई महापालिका हे मुंबईचे आर्थिक केंद्र असून, इथूनच सर्व अर्थचक्र चालते. गेल्या १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून या महापालिकेवर भगवाच फडकत आला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत पुन्हा भगवे वादळ आले असून, यापुढेही महापालिकेवर भगवा झेंडाच फडकणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

घोटाळ्यांची पोलखोलरस्ते घोटाळा, खडी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन या सगळ्यांत प्रशासक आणि सरकारकडून कशाप्रकारे घोटाळा करण्यात आला, याची पोलखोल आदित्य ठाकरे यांनी केली. रस्ते घोटाळ्यात पाच कंत्राटदार मित्रांसाठी पाच पाकिटे बनविली गेली. पाच विभागांतील रस्त्यांची कामे पाच कंत्राटदारांना वाटून दिल्याचा आरोप त्यांनी केला. 

पप्पू म्हणा किंवा काहीही, आव्हान देतो... सरकार ५० रस्ते पूर्ण करू शकणार नाही, असे म्हटल्यावर भाजप आणि खोके सरकारने आदित्य ठाकरेंवर टीका केली, मात्र तुम्ही मला पप्पू बोलताय ना, ठीक आहे. तुम्हाला पप्पू आव्हान देतो की, एकटे या किंवा पूर्ण फौज घेऊन माझ्या छातीवर वार करण्यासाठी या, माझी तयारी आहे, असे असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

डोळे बंद करून आठवली शाखेवरील कारवाई

आरोपांच्या फैरींनंतर मोर्चात सामील शिवसैनिकांना डोळे बंद करण्याचे आवाहन करीत आदित्य ठाकरे यांनी भावनिक साद घातली. वांद्रे येथील शिवसेनेच्या शाखेवरील कारवाईदरम्यान शिवसेनाप्रमुख यांच्या प्रतिमेवर चालविण्यात आलेला हातोडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना सच्चा मुंबईकर शिवसैनिकाला विसरता येणार नसल्याचे सांगत या निवडणुकीत त्यांना पळवून लावून त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

हिमंत असेल तर निवडणूका घ्या!कोणत्याही क्षणी निवडणूक लावा. आम्ही त्यासाठी तयार आहोतच आणि मग कळेल की खरा चोर कोण आहे ते, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला (शिंदे गट) आव्हान दिले आहे. या मोर्चादरम्यान  आदित्य ठाकरेंनी भ्रष्ट सरकारचे चार घोटाळे पुन्हा शिवसैनिकांच्या पुढे मांडत सरकार आणि प्रशासकांकडून मुंबईकरांची लूट चालू असल्याचा थेट आरोप केला. जूनपर्यंत ५० रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले असताना त्यातील एकही रस्ता अद्याप पूर्ण न केल्याची यादी सादर करीत स्पष्ट केले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेमुंबई महानगरपालिका