Join us

विजय माल्याच्या 'जंगी स्वागता'साठी कायपण; आर्थर रोडच्या बराकीत टाइल्स, रंगकाम अन् कमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 10:42 AM

मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12चं स्वरुप बदलण्यासाठीचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे,कारण...

मुंबई - मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12चं स्वरुप बदलण्यासाठीचे काम गेल्या महिन्याभरापासून जोरात सुरू आहे. बराकमधील फरशी बदलण्यात आली आहे, भितींवरील रंगकामदेखील पूर्ण झाले आहे आणि बाथरुमचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. आता तुम्ही विचारात पडले असणार की एवढा थाट आणि जोरदार तयारी नेमकी कोणासाठी?. दुसरे-तिसरे कोणासाठी नाही तर बँकांना तब्बल हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. दरम्यान, बराक क्रमांक 12 मध्ये यापूर्वी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. 

भारतीय कारागृहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं सांगत विजय माल्यानं प्रत्यार्पणासाठी विरोध दर्शवला होता, यासाठी कारागृह प्रशासनाकडून एवढी जय्यत तयारी करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास  त्याला आर्थर रोड जेलमध्येच ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, यापूर्वीही आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला होता. 

प्रत्यार्पणासाठी कोठडीचं नुतनीकरण माल्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात असलेल्या सीबीआयनं कारागृहातील नुतनीकरण केलेल्या कोठडीचं व्हिडीओ शुटिंगही करण्यात आले आहे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत मदत म्हणून हा व्हिडीओ परराष्ट्र मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. पीडब्ल्यूडीचं कंत्राट हाती घेणाऱ्या प्रमेश कन्स्ट्रक्शन्सनं बराकीच्या नुतनीकरणाचं काम हाती घेतले होते. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, कंत्राटदार शिवकुमार पाटील यांनी सांगितले की, त्यांनी बराक क्रमांक 12च्या नुतनीकरणाचं काम केले आहे.  

कोठडीमध्ये रंगरंगोटी, नवीन फरशी पाटील पुढे असंही म्हणाले की, मला यासंदर्भात अधिक काहीही बोलण्याची परवानगी नाहीय. माझ्या कामगारांनी तेथे काम केले आहे. कोठडीच्या रंगरंगोटीसहीत बराक क्रमांक 12कडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली आहे. फरशी नवीन बसवण्यात आली असून शौचालयाचीही डागडुजी करण्यात आली आहे. दरम्यान, लंडन कोर्टात माल्यानं म्हटलं होतं की, आर्थर रोड जेलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय नाहीय. यावर पाटील म्हणालेत की, सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबासाठी कोठडीमध्ये एका भिंतीवर काळा रंग लावण्यात आला आहे. 

नवीन कमोडपीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, 10 ऑगस्टला जेव्हा सीबीआयचे अधिकारी कोठडीचं व्हिडीओ शुटिंग करण्यासाठी गेले होते तेव्हा ते केलेल्या कामापासून खूश नव्हते. यानंतर 13 ऑगस्टपर्यंत पुन्हा कोठडीची योग्यरित्या डागडुजी करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा 16 ऑगस्टच्या दिवशी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्हिडीओ शुटिंग केले. कंत्राटदार पाटील यांनी सांगितले की, एकूण दोन कोठडींचं नुतनीकरण करण्यात आले. एक बराक क्रमांक 12 आणि छगन भुजबळ यांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्याचंही नुतनीकरण करण्यात आले आहे. शौचालयातही नवीन कमोड आणि जेट स्प्रे लावण्यात आला आहे. नुतनीकरणाच्या कामात 45 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 

यादरम्यान स्पेशल आयजी (कारागृह) दक्षिण मुंबई राज्यवर्धन सिन्हा यांनी म्हटलंय की, कारागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी डागडुजीचं काम सुरू करण्यात आले आहे. सरकारकडून कारागृहांच्या नुतनीकरणासाठी निधी देण्यात आला होता. जेव्हा कोणत्याही कारागृहामध्ये डागडुजीची गरज भासते तेव्हा काम करण्यात येते. याच अंतर्गत सर्व बराकींमध्ये रंगरंगोटीचं काम सुरू करण्यात आले आहे.

माल्याचं पलायन - विजय माल्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 कोटी रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. विजय माल्यानं देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17  सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र माल्या अगोदरच देश सोडून पसार झाला होता. 

टॅग्स :विजय मल्ल्याएसबीआय