व्यायामासाठी धावली मुंबई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:53 PM2019-01-20T23:53:07+5:302019-01-20T23:53:18+5:30
पोटासाठी धावणारी मुंबई रविवारी व्यायामासाठी धावली. निमित्त होते सोळाव्या मुंबई मॅरेथॉनचे. पहाटे थंडी कमी होती.
- सागर नेवरेकर
मुंबई : पोटासाठी धावणारी मुंबई रविवारी व्यायामासाठी धावली. निमित्त होते सोळाव्या मुंबई मॅरेथॉनचे. पहाटे थंडी कमी होती. मात्र, मुंबईकरांचा उत्साह दुप्पट दिसून आला. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सुमारे ४६ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. पहाटे ५.े३० वाजता अर्ध मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुरुवात झाली. यात धावपटंूनी सीएसएमटीहून माहिम चर्चपर्यंतचे अंतर कापले. माहिम चर्च येथून पुन्हा सीएसएमटीला मॅरेथॉनचा शेवट झाला. या वेळी ड्रीम रन, हाफ मॅरेथॉन, दिव्यांगांची मॅरेथॉन असे विविध प्रकार यात होते.
मॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी भांगडा नृत्य, ढोल-ताशा पथक, नाशिक ढोल, लेझीम, मनोरंजनात्मक कलांच्या सादरीकरणाचा आनंद घेत, स्पर्धकांनी मॅरेथॉन यशस्वीरीत्या पार पाडली. धावपटूंसाठी बिस्किटे, फळे इत्यादींची व्यवस्था नागरिकांनी केली होती. प्लॅस्टिकबंदी, पर्यावरण संवर्धनासह अन्य सामाजिक आणि आरोग्यविषयक विषयांवर संदेश देत, नागरिक रस्त्यावर धावले.
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये नक्षलवाद असलेल्या गोंदिया व गडचिरोली येथूून १५१ युवकांनी भाग घेतला होता. यात ३४ महिलांचा समावेश होता. युवकांमधील काही जण असे आहेत की, त्यांनी पहिल्यांदाच मुंबई पाहिली. गेल्या काही दिवसांपूर्वी गोंदिया व गडचिरोली भागातील ७ हजार लोकांची ६ किलोमीटरपर्यंतची पूर्ण, अर्ध आणि मिनी मॅरेथॉन घेण्यात आली होती. मुंबईसाठी ७ हजार स्पर्धकांमधील १५१ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
>तीन हजारांहून जास्त धावपटूंना वैद्यकीय साहाय्य
मुंबई मॅरेथॉनमध्ये रविवारी जवळपास ४६ हजार धावपटू सहभागी झाले. त्यातील तीन हजारांहून अधिक धावपटूंना वैद्यकीय साहाय्य करण्यात आले. यात ४१ धावपटूंना शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या भेडसावली, त्यांना त्वरित उपचार करुन पुन्हा धावण्यासाठी सक्षम करण्यात आले, तर १४ जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यातील ८ जण अर्ध मॅरेथॉनमधील तर ५ जण पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले धावपटू होते. १४ पैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील २५ वर्षीय पंकज पांडेला जी.टी. रुग्णालयात तर नीतिन चव्हाण (४४) चर्नी रोडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धावपटूंना सर्वाधिक शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या जाणवली़