Join us

‘तिसऱ्या डोळ्या’मुळे मुंबई सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 6:26 AM

पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे : आरोपींपर्यंत पोहोचण्यास मदत

मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई शहरातील घडामोडींवर करडी नजर ठेवण्यासाठी तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमेऱ्यांमार्फत सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचा तपशील थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात पोहचत असल्याने अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा माग काढणे शक्य होत आहे. परिणामी गुन्ह्यांचा आलेख कमी होत हे शहर पूर्वीच्या तुलनेत सुरक्षित झाले आहे.

२६/११च्या हल्ल्यादरम्यान आलेल्या अपयशानंतर तत्कालीन सरकारने शहरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्याची योजना आखली. २०१६ मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन झाले, मात्र २०१७ मध्ये ते कार्यान्वित झाले. मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणेत उच्च क्षमता असलेले १४९२ कॅमेरे, २० थर्मल कॅमेरे, ४८५० फिक्स बॉक्स कॅमेऱ्यांचा समावेश आहे. शहरातील १५१० संवेदनशील ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या दुकानदारांना सूचनामुंबई पोलीस पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्व दुकानदारांना  चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून गुन्हेगारापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. त्यानुसार अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. सीसीटीव्हीच्या वाढत्या जाळ्यामुळे प्रत्यक्ष हल्ला रोखणे अशक्य असले तरी त्यामुळे आपल्यावर तिसऱ्या डाेळ्याची नजर आहे, अशी भीती गुन्हेगारांना असते. भविष्यात आणखी सीसीटीव्ही बसविण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हजारो आरोपींना पकडण्यात यश आले आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यातही उपयुक्त एखादा गुन्हा घडल्यानंतर आरोपीचे रेखाचित्र काढण्यापासून, खबरी, स्थानिकांची चौकशी यामध्ये पोलिसांचा बराच वेळ वाया जात असे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीची झटपट ओळख पटविण्यास पोलिसांना मोलाची मदत होते. साेबतच संशयास्पद व्यक्ती, वस्तूंवर नजर ठेवणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे तसेच इतर तक्रारी सोडविण्यासाठीही सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुंबईतील सर्वात मोठी समस्या असलेल्या वाहतूक कोंडीवरही नियंत्रण ठेवण्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरत आहेत. ई चलनाद्वारे दंड आकारणेही सोयीस्कर झाले असून पोलिसांसोबत होणारा वादही कमी झाला आहे. 

टॅग्स :मुंबईपोलिससीसीटीव्ही