संजीव साबडे, मुक्त पत्रकार
पोर्तुगीजांनी येथे चर्च, पवित्र क्रॉस उभारलं होतं. एका युद्धात ते मराठ्यांनी पाडलं. पुन्हा दोनदा त्याची उभारणी करण्यात आली. या क्रॉसमुळेच स्टेशनला नाव दिलं गेलं सांताक्रूझ. अनेक देशांमध्ये या नावाची गावं, शहरं आहेत.
आग्रीपाडा, चुनाभट्टी, गोळीबार अन् कोळे कल्याण भागात कोल्हे होते. काही लांडगेही. तो भाग काहीसा डोंगराळ होता. तिथं आणि जवळच्या वंकोला गावात प्रामुख्यानं वस्ती होती ईस्ट इंडियनची. वंकोला गावात त्याच नावाची छोटी नदी. खरं तर ती मिठी नदीची उपनदी. आता तिचाही नाला झालाय. तिथून पुढे आलात की रायफल रेंज, त्यामुळे मराठीत नाव पडलं गोळीबार मैदान...आता मैदान दिसतच नाही. सरकारी नोंदीनुसार तिथल्या झोपडपट्टीत २६ हजार कुटुंब राहतात. आणखी पुढे गेलात की, रेल्वे स्टेशन, स्टेशनच्या एका बाजुला होती चुनाभट्टी. दुसरीकडे एक पवित्र क्रॉस व चर्च. ते पोतुगीजांनी उभारलं होतं आणि एका युद्धात मराठ्यांनी पाडलं. पुन्हा दोनदा त्याची उभारणी करण्यात आली. त्या भागात सारस्वतांची कॉलनी, विलिंग्डन क्लब व कॉलनी. या पवित्र म्हणजे होली क्रॉसमुळेच स्टेशनला नाव दिलं गेलं सांताक्रूझ. गंमत म्हणजे अनेक देशांमध्ये या नावाची गावं, शहरे आहेत. तेथील होली क्रॉस हेच त्यांचंही कारण. कोळे कल्याण म्हणजे आजचा कलिना भाग. पोर्तुगीज व ब्रिटिश त्याला कलियाना म्हणत. आता तिथं मुंबई विद्यापीठ, पूर्वी हवाईल दल व आता विमान प्राधिकरणाकडे आलेला बहुतांशी खासगी विमानांचा तळ, आजही एअरफोर्स कॉलनी आहे. तिथून कलिनावरुन पुढे गेलात की सरळ कुर्ला व चेंबूर आणि उजवीकडे वांद्रे कुर्ला संकुल. त्या मार्गावर असलेला ऑटो पार्ट्सचा अस्ताव्यस्त परिसर चोर बाजार म्हणून ओळखला जातो.
मुस्लीम, ख्रिश्चन, गुजराती...सांताकुझ स्टेशनकडे येताना वंकोला म्हणजे आजच्या वाकोल्यात पूर्वी मथहर (म्हातार) पाखाडी, भट्ट पाखाडी, देसाची पाखाडी, रणवार पाखाडी, कॉर्डरिओ वाडी अशा वस्त्या होत्या. ईस्ट इंडियन, आग्री, भंडारी व ईस्ट इंडियन यांची वस्ती असलेल्या सांताक्रूझच्या पूर्वेकडे आता उत्तर भारतीय, मुस्लिम, ख्रिश्चन व गुजरातीही आहेत.
लिंकिंग रोड... खरेदीच माहोल
१. सांताकुझ पश्चिमेला आलात की, उजवीकडे होली क्रॉसला लागून सेक्रिड हार्ट हायस्कूल आहे. स्वामी विवेकानंद मार्गावर पोदार हायस्कूलचा प्रचंड पसारा. जुहू तारा मार्गावरील बागेत लहान मुलांसाठी प्रचंड विमान, पुढे एसएनडीटी महिला कॉलेज, पुढे जुहू चौपाटी.
२. बागेकडून डावीकडे वळलात तर आर्य समाज व पुढे खार वांट्याकडे महिलांचा आवडता व त्यांच्या वस्तूंचा लिंकिंग रोडचा बाजार, बागेकडून उजवीकडे वळलात तर तो भाग पूर्वीचा चुनाभट्टीचा. तिथंच जवळ आहे साने गुरुजी आरोग्य मंदिर व रात्रशाळा. ती सुरू करण्यात वसंत बापट, सदानंद वर्दे, लीलाधर हेगडे यांचा पुढाकार होता.
३. मिलन सबवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजवीकडे ऑटोपार्ट्सची बरीच दुकानं आहेत. जवळच मोठं म्युनिसपल गॅरेज. समोर बेस्ट डेपो आणि बाजुला आयुर्विमा मंडळाची मोठी इमारत. पुढे विले पार्ले.
४. येथे काही मराठी मंडळींची घरे आहेत. अनेक फिल्मी कलाकारांचे बंगले आजही आहेत. स्टेशनजवळचं मार्केट कायम गर्दीचं. समोर दागिन्यांची दुकानं. आत हसनाबाद लेन. कपडे खरेदीसाठी तिथं झुंबड असते. खरेदीनंतर व आधी जवळच्या सँडविच दुकानात धाव. सांताक्रूझ पश्चिम म्हणजे जणू स्टाइल में रहने का!