मुंबई - मुंबई कोस्टल रोडवरील वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव दिले जाणार आहे. तसेच शिवडी ते न्हावा-शेवा या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतू असे नामकरण करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी या नामकरणाला मान्यता दिली.
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचे नाव देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार हे नाव देण्यात आले आहे. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा सागरी सेतू ९.६ किलोमीटरचा असून, तो आठपदरी आहे. तसेच याला ७.५७ किलोमीटरचा जोड रस्ता असेल. डिसेंबर २०२६ पर्यंत हा सागरी सेतू पूर्ण होणार आहे. तर एमटीएचएल हा प्रकल्प ९५ टक्के पूर्ण झाला असून, डिसेंबर २०२३ पर्यंत तो वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी या सेतूला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.