कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही ९२ टक्क्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू मुंबई सावरत असल्याचे दिसते आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर शहर उपनगरातील पॉझिटिव्हिटी रेट १९ टक्क्यांवर होता. सध्या हा रेट ६.५७ टक्के इतका आहे. म्हणजे महिनाभरात पॉझिटिव्हिटी रेट जवळपास १३ टक्क्यांनी कमी झाला. मुंबईकरांसाठी हे दिलासादायक चित्र आहे.
१४ एप्रिल रोजी मुंबईत ८७ हजार ४४३ सक्रिय रुग्णांची नोंद होती, तर रुग्ण बरे होण्याचा रेट हा ८१ टक्के होता. सध्या मुंबईत ३७ हजार ६५६ सक्रिय रुग्ण असून बरे होण्याचा रेट हा ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पालिका प्रशासनाने चार जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरु केली असून यामुळे सहा हजार खाटांची भर पडणार आहे, तर अतिदक्षता विभागात १५०० खाटाही वाढणार आहेत.
एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट हा २०.८ टक्के होता, तर अखेरीस तो ९.९ टक्क्यांवर आला. कोरोनाच्या पहिल्या लाटेल दिवसाला केवळ १८-२० हजार चाचण्या व्हायच्या मात्र दुसऱ्या लाटेत यात वाढ करुन हे प्रमाण दिवसाला ४०-५० हजारांवर करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत गेल्यानंतर त्वरित पालिका प्रशासनाने १२ हजार खाटांवरुन २३ हजार खाटांची उपलब्धता निर्माण केली. त्याशिवाय, शोध, चाचण्या, निदान, उपचार यावर भर दिला. तसेच, मृत्यूदर कमी करण्यासाठी अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींवर विशेष लक्ष दिले. सध्या मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांत अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, कांदिवली आणि मालाड येथील रुग्णांचे प्रमाण ४० टक्के आहे.