Mumbai School: मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीतच हवेत, महानगरपालिकेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 05:58 PM2022-04-05T17:58:35+5:302022-04-05T17:58:49+5:30
मुंबईतील विद्यापीठांच्या नामफलकानंतर आता मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत झळकणार आहेत.
मुंबईतील विद्यापीठांच्या नामफलकानंतर आता मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत झळकणार आहेत. कारण तशा सूचना मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व शाळांना दिल्या आहेत. मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आणि प्रसार व्हावा यासाठी मुंबई मनपाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत लावावे लागणार आहेत.
राज्य सरकारकडून राज्यातील सर्व आस्थापने आणि दुकानांचे फलक मराठीत करण्याचे अनिवार्य केल्यानंतर आता मुंबई मनपाने शाळांच्या नामफलकाचा मुद्दा उपस्थित करत शाळांच्या इंग्रजीतील नामफलांना विरोध करत शाळांची नावे मराठीतच लिहीली जावीत असा निर्णय घेतला आहे. युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाकडे मागणी करत मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्व महाविद्यालयाचे नाम फलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.
त्यानंतर युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील नामफलक सुद्धा मराठीत करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आज काढलेल्या परिपत्रकाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश मुंबईतील अनुदानित ३९४, विनाअनुदानित ६७८ आणि अन्य खासगी बोर्डाच्या २१९ शाळांना दिले आहेत.