चौपाट्या होत आहेत मृत्यूचे सापळे : सावधान! पुढे धोका आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:12 AM2018-07-09T04:12:30+5:302018-07-09T04:12:48+5:30

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाºया गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा व गोराई या प्रमुख सहा चौपाट्या आहेत.

mumbai Sea Face News |  चौपाट्या होत आहेत मृत्यूचे सापळे : सावधान! पुढे धोका आहे...

 चौपाट्या होत आहेत मृत्यूचे सापळे : सावधान! पुढे धोका आहे...

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई  - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाºया गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा व गोराई या प्रमुख सहा चौपाट्या आहेत. मात्र या चौपाट्या आता मृत्यूचे सापळे बनत असून जीवरक्षकांची कमतरता आणि तुटपुंज्या सुविधा यामुळे बीचेसची सुरक्षितता रामभरोसे आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वर्सोवा येथे एक जोडपे बुडाले होते, तर जुहू येथे नुकताच चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. ८ जून २००० रोजी आक्सा बीचवर मालाड पूर्व
येथील बारा मुलांचा बुडून मृत्यू
झाला होता.
त्या वेळी आघाडी सरकारमधील माजी मंत्री छगन भुजबळ व कृपाशंकर सिंह यांनी येथे भेट देत मुंबईतील बीचेसवर सुविधा पुरवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र आज अठरा वर्षांनंतरही मुंबईच्या बीचेसची सुरक्षितता रामभरोसे आहे.
मुंबई उच्च न्यायालयानेही महापालिकेला मुंबईच्या या बीचेसच्या सुरक्षिततेबाबत फटकारले आहे. मात्र आज तरी मुंबईतील बीचेसवर बुडणाºया दुर्घटना रोखण्यात मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला आलेले अपयश ही एक चिंतेची बाब आहे.

जुहू येथील चौपाटीवर चार मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. येथील रुईया पार्क हा नो मॅन लँड असून येथे जीवरक्षक नसतात. येथे समुद्राला वेगवान प्रवाह आणि भोवरा होता. समुद्रात जाऊ नका, अशी सूचना स्थानिकांनी या समुद्रात गेलेल्या पाच मुलांना दिली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून ही मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली. त्यातील एका मुलाला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले. मात्र इतर चार मुलांचा मृत्यू झाला. सहा बीचेसवर सर्व कानाकोपºयात जीवरक्षक ठेवणे शक्य नाही. समुद्रात पोहणे धोकादायक आहे. समुद्रात पोहायला उतरू नका. पावसाळ्यात हाय व लो टाइड कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी आहे याबद्दल माहिती देणारे फलक समुद्रकिनारी आहेत. काही वेळा मुले मद्यपान करून समुद्रात उतरतात. मात्र मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे.
- प्रभात रहांगदळे, प्रमुख,
मुंबई अग्निशमन दल

मुंबईच्या या सहा चौपाट्यांवर रोज आणि विशेषकरून शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक येतात. मात्र सहा बीचेसवर अग्निशमन दलाचे ११ कायम, २० कंत्राटी आणि ६ हंगामी असे एकूण फक्त ३८ जीवरक्षक आहेत. तुटपुंज्या जीवरक्षकांवर मुंबईच्या बीचेसची जबाबदारी आहे. त्यांना मिळणाºया वेतनात तफावत आहे. कायमस्वरूपी जीवरक्षक आठ तास आपली ड्युटी करून दरमहा सुमारे २५ ते ३० हजार रुपये पगार घेतात. खासगी व कंत्राटी जीवरक्षक दहा तास काम करून बारा हजार रुपये पगार घेतात.

३४ वर्षे जीवरक्षक म्हणून कार्य करणारे रजनीकांत माशेलकर यांनी सांगितले की, मुंबईच्या या सहा बीचेसची भौगोलिक स्थिती आणि तीन ते पाच किमीवर पसरलेले बीचेस पाहता केवळ ३८ जीवरक्षकांच्या जिवावर मुंबईच्या चौपाट्यांच्या सुरक्षिततेची अपेक्षा करणे योग्य नाही. सहा बीचेसवर किमान शंभर जीवरक्षकांची गरज आहे. जुहू येथील पर्यटकांची दिवसेंदिवस वाढती गर्दी लक्षात घेता येथे किमान तीस तरी जीवरक्षक असणे गरजेचे आहे, असेही रजनीकांत माशेलकर यांनी सांगितले.

तोडगा नाही
चौपाट्यांची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला या प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही.
सहा बीचेसवर वॉच टॉवर, दुर्बीण, मेगाफोन, व्हीसल, स्ट्रेचर, अ‍ॅम्ब्युलन्स या सुविधांचा अभाव आहे.
जुहू चौपाटीवर वायएमसीए या संस्थेने चौकी दिली असून त्यामुळे जीवरक्षकांना त्याचा खूप फायदा झाला आहे. मुंबई अग्निशमन दलाने दिलेले रिंग व जॅकेट हे त्या चौकीमध्ये ठेवणे शक्य झाले आहे.
उर्वरित काही चौपाट्यांवर जीवरक्षकांना बसण्याचा आणि कपडे बदलण्याचा काही ठावठिकाणा नाही. गेली सहा वर्षे साधा गणवेशसुद्धा जीवरक्षकांना देण्यात आला नाही.

Web Title: mumbai Sea Face News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.