Join us

मुंबईच्या समुद्राचे पाणी अखेर गोडे होणार, प्रशासन मागविणार निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:42 PM

‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवरच मुंबईकरांची तहान भागत असून पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पालिकेने इस्रायलच्या मदतीने समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पाची एक वीटही अद्याप रचलेली नसली तरी पालिका याबाबत लवकरच निविदा काढणार आहे. या संदर्भात सोमवारी आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने त्याची दखल घेतली.

मुंबईत मोठ्या वाढत्या लोकसंख्येबरोबर पिण्याच्या पाण्याची गरजही वाढत आहे. २०४१ पर्यंत मुंबईकरांच्या पाण्याची गरज ५,९४० दशलक्ष लीटर इतकी होणार आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अजूनही पावसावरच अवलंबून राहावे लागते. एखाद्या वर्षी सात तलावांत पाऊस कमी प्रमाणात पडला तर मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. सध्या तरी सात धरणांव्यतिरिक्त पालिकेकडे जलस्रोताचा दुसरा पर्याय नाही. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे १२ हेक्टरवर निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. इस्रायलच्या आय. डी. वॉटर टेक्नॉलॉजी या कंपनीच्या सहकार्याने १६०० कोटी खर्च करून पालिका समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने २०० कोटींची तरतूद केली असतानाही अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता, तो अद्याप सुरूही झालेला नाही. येत्या सोमवारी या बाबत आयुक्त डॉ इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही वेलरासू यांनी दिली.

दरम्यान, हा प्रकल्प मार्गी लागल्यास याचा नक्कीच मुंबईकरांना फयदा होणार आहे.

टॅग्स :मुंबई