ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई जगात दुस-या स्थानावर असून, बांगलादेशातील ढाका शहर पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने जगातील दहा घनदाट लोकवस्तीच्या शहरांची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये भारतातील मुंबई आणि राजस्थानतील कोटा या दोन शहरांचा समावेश आहे. ढाक्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 44,500 नागरीक वास्तव्य करतात तर, मुंबईत प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 31,700 लोक राहतात.
राजस्थानातील कोटा शहरही लोकसंख्या वाढीमध्ये पाठी नाहीय. उद्योगनगरी, स्पर्धापरीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी ओळखले जाणारे कोटा शहर घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये सातव्या स्थानावर आहे. कोटामध्ये प्रतिचौरस किलोमीटरवर सरासरी 12,100 लोक वास्तव्य करतात.
या यादीत मेडीलीन तिस-या, मनिला चौथ्या, कासाब्लानका पाचव्या, लागोस सहाव्या, अबुजा आठव्या, सिंगापूर नवव्या आणि जकार्ता दहाव्या स्थानावर आहे. जगातील घनदाट लोकवस्तीची सहा शहरे आशिया खंडात, तीन आफ्रिका खंडात आणि एक दक्षिण अमेरिकेत आहे.
कोटाच्या वाढत्या लोकवस्तीबद्दल बोलताना महापौर महेश विजयवर्गीय म्हणाले की, चंबल नदीमुळे पाण्याची उपलब्धता आणि विनाखंड वीज पुरवठा यामुळे नागरीक मोठया संख्येने कोटामध्ये स्थायिक होत आहेत. कोटा शहराला जंगलानी वेढलेले आहे. त्यामुळे निवासी बांधकामासाठी मर्यादीत जागा उपलब्ध आहे. त्यामुळे दाटीवाटीने राहणा-या लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे असे विजयवर्गीय यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस असल्याने विद्यार्थीही त्यांच्या पालकासह इथे राहतात. शेतकरी वर्गही नोकरीसाठी कोटामध्ये स्थलांतरीत होतोय त्यामुळे शहरात दाटावाटी वाढत चाललीय असे त्यांनी सांगितले.