Join us

राणा दाम्पत्याला जामीन नाहीच! तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टानं निकाल राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 6:10 PM

राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून जामीन नाही; सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांची रवानगी तुरुंगात झाली. गेल्या आठवड्याभरापासून राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगात आहे. राणा यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला. न्यायालय ४ मे रोजी निकाल देणार आहे. त्यामुळे राणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

सत्र न्यायालयाकडून आज निकाल अपेक्षित होता. अमरावतीमध्ये राणा समर्थक एकवटले होते. राणांना जामीन मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र अन्य प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणी आणि त्यामुळे वेळेचा अभाव यामुळे राणांच्या जामिनावर न्यायालयानं आज निकाल दिला नाही. आता पुढील सुनावणी ४ मे रोजी आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार की त्यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार, हा प्रश्नाचं उत्तर परवा मिळेल.

राणांच्या वकिलांचं तुरुंग अधिकाऱ्यांना पत्रसामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडल्याचं त्यांचे वकील यांनी म्हटलं आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा सध्या भायखळ्याच्या तुरुंगात आहेत. नवनीत राणांना स्पॉंडेलिसिसचा त्रास आहे. त्यांच्या वकिलांनी प्रकृतीसंदर्भात तुरुंग प्रशासनाला पत्र लिहिलं आहे.

माझ्या अशील नवनीत राणांना स्पॉंडेलिसिसचा त्रास होतो. त्यांना तुरुंगामध्ये जमिनीवर बसायला आणि झोपायला लावण्यात आलं. त्यामुळे हा आजार वाढला. डॉक्टरांनी सीटी स्कॅनसाठी विनंती केली. त्यासाठी अर्जही करण्यात आला. मात्र त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. राणा यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी तुरुंग अधिकाऱ्यांची असेल, असं राणांच्या वकिलांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे.

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणा