मुंबई : प्रभादेवीमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पा चालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू आहे. पोलिस हवालदार अरुण रामचंद्र घाटकर (४८) यांच्या फिर्यादीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्रभादेवी येथील इराणी चाळीत असलेल्या ‘सिल्वर थायी स्पा’ येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच, पथकाने छापा टाकून कारवाई केली. तेव्हा, स्पा चालक मोहम्मद हुसेन ऊर्फ सोनू मोहम्मद अकम शेख (२५), मॅनेजर दिपू नारायण (३२) तसेच जागा मालक नीलेश शहा हे स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली जागेचा वापर कुंटणखान्यासाठी करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, गुन्हा नोंदवित त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. स्पा सेंटरमधून सुटका केलेल्या चार तरुणींना चेंबूर येथील वात्सल्य गृहात पाठविण्यात आले आहे. याबाबत दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अनेक सदनिकांमध्ये असा व्यवसाय सुरू असल्याच्या घटना घडत असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. असा प्रकार नजरेस आल्यास तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणावे असे आवाहन केले आहे.