भारतीय स्वातंत्र्यलढ्याला मुंबईने दिला आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:05 AM2021-08-15T04:05:57+5:302021-08-15T04:05:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘स्वातंत्र्य’ हा शब्द उच्चारायला सोपा वाटत असला, तरी ते मिळवण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘स्वातंत्र्य’ हा शब्द उच्चारायला सोपा वाटत असला, तरी ते मिळवण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ब्रिटिशांचा ना-ना तऱ्हेचा जुलूम सहन केला, कित्येक वर्षे तुरुंगवास भोगला, ऐन उमेदीची वर्षे भूमिगत राहून घालवली. त्यामुळेच आजची सोनेरी पहाट प्रत्येक भारतीयाच्या नशिबी आली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लढे उभारले गेले. मात्र, या लढ्यांना आकार देण्याचे काम मुंबईने केले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातील मुंबईचे योगदान अतुलनीय आहे.
१८५७च्या उठावाआधी आणि नंतर झालेल्या प्रत्येक लढ्याला मुंबईने साथ दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महत्त्वाच्या योजना मुंबईतूनच आखल्या गेल्या. मुंबईत स्वातंत्र्याची खरी ज्योत पेटली ती १९०८ साली लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर. मजूर, श्रमिक आणि कष्टकऱ्यांनी संघटित होत तब्बल सात दिवस याविरोधात आंदोलन पुकारले. त्याची दखल स्वतः लेनिननेही घेतली. त्यावेळचे त्यांचे उद्गार होते... ‘हे कामगारांचे आंदोलन नसून, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय लोक किती जागरूक झाले आहेत, त्याचे हे द्योतक आहे’. मुंबई ही कामगारांची भूमी असल्यामुळे या कामगार वर्गातूनच पुढे अनेक स्वातंत्र्यसेनानी, लोकशाहीर जन्माला आले, अशी माहिती कॉ. प्रकाश रेड्डी यांनी दिली.
९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने स्वातंत्र्यलढ्याला आकार देण्याचे काम केले. ८ ऑगस्ट १९४२ पर्यंत भारताला स्वतंत्र करण्याचे आश्वासन ब्रिटिशांनी दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने स्वातंत्र्य संग्रामाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने ८ ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर अधिवेशन भरवले. मात्र, दडपशाहीचा अवलंब करीत ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात डांबले. त्यामुळे देशात राजकीय पोकळी निर्माण झाली. ‘चले जाव’ चळवळीचे नेतृत्व कोण करणार, मैदानावर तिरंगा कोण फडकावणार, याची चिंता साऱ्यांना होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक २२ वर्षांची शिडशिडीत तरुणी जमावातून धावत ध्वजस्तंभाजवळ आली. नारळाच्या झाडावर चढावे तसे तिने खांबावर झेप घेतली आणि दोरी ओढून तिरंगा फडकावला. ती तरुणी म्हणजे अरुणा असफ अली. यानंतर चले जाव चळवळीचे लोण साऱ्या भारतभर पसरले आणि इंग्रजांच्या सत्तेला हादरे बसू लागले.
.........
नौसैनिकांचा लढा ठरला निर्णायक
- १९४६ साली मुंबई आणि कराची येथे झालेला नौसैनिकांचा उठाव हा भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक मैलाचा दगड ठरला. इंग्रजांकडून मिळणारी अमानुष वागणूक, दुय्यम दर्जाचे अन्न आणि सततच्या अपमानामुळे सैनिक कंटाळले होते. ‘इंडियन्स आर डॉग’, हे वाक्य बंडाला कारणीभूत ठरले. मुंबई आणि कराचीतील नाविक तळांवर बंडाळी माजली. पुढे ते लोण कांडला, विषाखापट्टणम, लाहोर, दिल्लीत पसरले.
- २२ फेब्रुवारी १९४६ रोजी ‘तलवार’ या युद्धनौकेवरील युनियन जॅक खाली खेचून त्या जागी तिरंगा उभारण्यात आला. ही बंडाळी थोपवण्यासाठी ब्रिटिशांनी विशेष तुकडी आणि रणगाडे पाठवले. या आंदोलनात ३०० लोक मारले गेले, तर १५०० जखमी झाले. हा लढा इतका निर्णायक ठरला की, १९४६ मध्ये ब्रिटिशांनी 'कॅबिनेट मिशन' भारतात पाठवले आणि सत्तांतरणाच्या हालचाली सुरू झाल्या, असे रेड्डी यांनी सांगितले.
............
महिलांचा सहभाग
स्वातंत्र्य संग्रामात मुंबईतील महिलांनी गाजवलेले शौर्य अतुलनीय असे आहे. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला. टिळकांनी सुरू केलेल्या ‘स्वराज्य फंडा’साठी मुंबईतील स्त्रियांनी स्वतःच्या अंगावरचे दागिनेही दिले होते. शिवाय देशप्रेम जागृत करण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या सण-उत्सवांत महिलांनी सक्रिय सहभाग घेत स्वराज्याची मशाल तेवत ठेवली. १९३० सालच्या असहकार आंदोलनात मुंबईतील ९३० महिलांना अटक करण्यात आली होती. शिवाय चले जाव चळवळीत महिलांचा सहभागही मोठा होता. उषा मेहतांनी भूमिगत आंदोलनाचे सगळे नेतृत्व सांभाळले, अरुणा असफ अली तर चले जाव चळवळीच्या खऱ्या नायिका ठरल्या. त्याशिवाय अवंतिका गोखले, काशिबाई नौरंगे यांनीही स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशी माहिती इतिहास अभ्यासिका प्राची मोघे यांनी दिली.
...........
बाबू गेनू यांना विसरून कसे चालेल?
गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचा पुरस्कर्ता असलेल्या बाबू गेनू यांनी १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक काळबादेवी परिसरात अडवला. ब्रिटिशांना पुढे जाऊ न देण्यासाठी ते स्वतः ट्रकपुढे आडवे झाले. त्यामुळे उद्दाम इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या अंगावरून ट्रक पुढे नेला. बाबू गेनू यांना हौतात्म्य लाभले. त्यांचे बलिदान न विसरण्यासारखे आहे.