मुंबई-शिर्डी पालखी मार्गावर सर्व सुविधा देणार - कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:20 AM2020-01-09T05:20:40+5:302020-01-09T05:20:57+5:30
राज्यातील तीर्थक्षेत्रांचे विकास कार्य हाती घेण्यात येईल. मुंबई-शिर्डी मार्गावर अनेक भक्त पायी जातात.
मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांचे विकास कार्य हाती घेण्यात येईल. मुंबई-शिर्डी मार्गावर अनेक भक्त पायी जातात. या यात्रेकरूंसाठी सदर मार्गावर शौचालये, पिण्याचे पाणी व इतर सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहातील अभिभाषणात दिली.
नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती येथे आदिवासी मुलामुलींमधून उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा अकादमी उभारण्यात येतील, असे राज्यपालांनी सांगितले. आपले सरकार स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीने प्रेरित असल्याचे ते म्हणाले. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना लाभदायक असणाऱ्या योजना राबविण्यात येतील असे सांगताना त्यांनी संत रामदासांची ओवी उद्धृत केली. हे वर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचे साठावे वर्ष आहे.शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, शिवभोजन थाळी या योजनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्यात युवकांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल. महिलांच्या संबंधातील गुन्ह्यांबाबत त्वरित व कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने कायद्यांमध्ये यथोचित सुधारणा करण्यात येतील, असे राज्यपाल म्हणाले.