Join us

मोदींनी दाखवून दिली 56 इंचाची छाती; युतीनंतर शिवसेना नेत्यांकडून स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 3:28 PM

भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. त्यानंतर शिवसेनेनं मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

मुंबई- भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. त्यानंतर शिवसेनेनं मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. इतक्यावरच न थांबता शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, आम्ही त्यांच्या घरात घुसून हल्ला केला आहे. लष्कराचा खूपच अभिमान वाटतो.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 56 इंचाची छाती दाखवून दिली आहे. पंतप्रधान हे कर्णधार असल्यानं एअर स्ट्राइकचं श्रेय त्यांचंच आहे. तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदेंनीही मोदींचं कौतुक केलं आहे. लष्कराला स्वातंत्र्य देण्याची मोदींनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. आम्ही हवाई दलाच्या या कारवाईचं स्वागत करतो. आम्हाला आमच्या लष्करावर गर्व आहे. पाकिस्तानवर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव बनवून ठेवला पाहिजे. पाकिस्तान फक्त पोकळ धमक्या देतो.पाकिस्तानजवळ काहीच नाही. त्यांना भारताच्या ताकदीचा अंदाज नाही. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री दिवाकर रावतेंनीही मोदींची तारीफ केली आहे. ते म्हणाले, गेल्या चार-पाच वर्षांत देशासाठी अनेक जवान शहीद झाले. लष्करानं त्याचा बदला घेतला. त्यामुळेच आम्हाला भारतीय लष्करावर गर्व आहे, असं दिवाकर रावते म्हणाले आहेत.

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानच्या बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज2000’ची 12 लढाऊ विमानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. त्यावेळी मोदी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचं पूर्ण मोहिमेवर लक्ष होतं. बालाकोटमध्ये जवळपास 3.45 वाजता, मुजफ्फराबादमध्ये 3.48 वाजता, तर चाकोटीमध्ये 3.58मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय हवाई दलएअर सर्जिकल स्ट्राईक