टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे राज्यासह मुंबईत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय मुंबईत अनलाॅक नको, असे मत राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. राज्यात गर्दीच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन न झाल्यास २ ते ४ आठवड्यांत तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, दुसरी लाट ओसरली आहे. याविषयी स्पष्टता येण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर हा दोन आठवडे सलग पाच टक्क्यांच्या खाली राहायला हवा. पुढील चार ते पाच महिन्यांत गतीने लसीकरण करून लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांवर न्यायला हवे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनीही जुलैअखेरीस तिसरी लाट येईल, असा इशारा दिला आहे. लसीकरणाचा वेग आपण या एक-दोन महिन्यांत वाढविला आणि जास्तीत जास्त नागरिकांना पहिला डोस दिला तरी आपण तिसरी लाट थोपवू शकतो, असेही डॉ. सुपे यांनी सांगितले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी जुलै-ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेचा कहर असेल असे स्पष्ट केले, तर पाच महिन्यांत केवळ पाच टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, लसीकरणाचा वेग मंदावला आहे, सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून, नागरिकांनी काेरोना नियमांना हरताळ फासण्यास सुरुवात केली आहे. डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येण्याची शक्यता दाट झाल्याचे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.