मुंबई : जगात इंधनासाठी नैसर्गिक वायूचा वापर हा २४ टक्के होतो; तर भारतात हे प्रमाण ६ टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असलेल्या सीएनजीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी केले. येत्या दोन वर्षांत सीएनजीचा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महानगर गॅस निगमकडून रविवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएनजी किट असलेल्या स्कूटीचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आजही अनेक मुंबईकरांकडे एलपीजी गॅस सिलेंडर आणि नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मुंबईसह देशात सीएनजी आणि एलपीजीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, सीएनजी किट बसवलेल्या दुचाकी वाहनधारकाना काही सूट देता येइल का? याचा विचार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे प्रधान यांनी सांगितले तर जे विद्यार्थी ग्रीन एनर्जी प्रणालीचा वापर आपल्या दुचाकीमध्ये करतील. त्या पर्यावरण रक्षक विद्यार्थ्यांना अंतिम परिक्षेत जास्त गुण देण्याचा शिक्षण विभाग विचार करेल. त्यामुळे स्पर्धात्मक परिक्षेत या वाढीव गुणांचा त्यांना फायदा होईल. असे शिक्षणमंत्री विनोद तावडे, यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सीएनजी वापरासाठी मुंबईने पुढाकार घ्यावा
By admin | Published: January 02, 2017 7:00 AM