- आलोक राजवाडे, अभिनेता
माझ्या ‘अक्षर नंदन’ या पुण्याच्या शाळेतच माझ्या नाट्यवेडाला खतपाणी मिळालं. आम्हाला त्या शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी शिकवल्या जायच्या. स्वयंपाकाचा आणि शेतीचासुद्धा तास असायचा. शाळेच्या छोट्या मोठ्या नाटुकल्यात कामं करताना मला या विषयाची इतकी रुची कधी आणि कशी लागली ते कळलंच नाही. प्रायोगिक नाटकांची परंपरा आणि संस्कृती जितकी पुण्यात जपली जाते तितकी अभावानेच एखाद्या शहरात होत असेल. इथे तुमची मुळं खोलवर रुजतात. ऋता पंडित मॅडमच्या जागर संस्थेकडून मी पहिल्यांदा ‘अब्राहम लिंकनचं पत्र’ नामक प्रायोगिक नाटकात काम केलं. या संस्थेत मला खूप काही नवीन नवीन शिकायला मिळालं. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना ‘आसक्त’ या प्रायोगिक संस्थेतही अभिनय, दिग्दर्शन दोन्ही करायची संधी मिळाली. हे सर्व करत असताना अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, पर्ण पेठे आणि इतर मित्रमैत्रिणींबरोबर आम्ही स्वतःची ‘नाटक कंपनी’ नामक संस्था सुरु केली. प्रायोगिक नाटकांसाठी पुण्यासारखी भुसभुशीत जमीन दुसरी कुठेच मिळणार नाही. मुंबईतली माझी एंट्री तशी सहज झाली. कारण इथेही आजूबाजूला भरपूर पुणेकर होते. दरम्यानच्या काळात सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकरांबरोबरही व्यावसायिक चित्रपटात काम करायची संधी मिळाली. ‘विहीर’ हा माझा पहिला चित्रपट. पण सर्वात जमेची बाजू म्हणजे मला त्यांच्याकडे अभिनयाबरोबरच त्यांना असिस्टही करायला मिळालं. सारंग साठ्ये बरोबर ‘भाडिपा’ सुरू झाल्यावर मात्र मुंबईत वास्तव्य करणं क्रमप्राप्त होतं. सुरुवातीला अनेक पुणेकर कलाकारांसारखा मीही रहायला गोरेगावला होतो. पण, मग नंतर तिथून शिफ्ट झालो, आणि सध्या मी सागर देशमुखकडे राहतो. मुंबई शहराने मला विश्वरूप दर्शन घडवलं. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जमिनीवर आणलं. पुण्यात काहीतरी क्रिएटिव्ह काम करायला तुम्हाला अवकाश मिळतो. मुंबईत तसं नाहीये. तुम्हाला कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम करायचंय. नव्हे, इथली स्पर्धा तुम्हाला काम करायला उद्युक्त करते. पोटापाण्यासाठी इथे राहाणं तर आवश्यक आहे. पण इथली गर्दी पाहता मी इथे कायमचं राहण्याबद्दल सध्या तरी काहीच विचार केला नाहीये.- शब्दांकन : तुषार श्रोत्री