मुंबई - मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष आजपासून सुरू होतोय. प्राथमिक फेरीसाठी तब्बल 150 पेक्षा अधिक दिग्गज, उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंची शनिवारी सकाळपासूनच कांदिवलीच्या ग्रोवेल मॉलवर गर्दी होणार असून 9 गटांत होणाऱ्या प्राथमिक फेरीतून 54 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मुंबई श्री स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनासाठी प्राथमिक फेरीतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे पीळदार ग्लॅमर निवडून स्पर्धेची अंतिम फेरी आणखी आकर्षक केली जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक क्रीडाप्रमी सिद्धेश रामदास कदम यांनी दिली. मुंबई श्री चा फैसला रविवारी कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या सेंट लॉरेन्स हायस्कुलच्या पटांगणात लागेल.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई श्री स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन केले आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी मुंबईचे पीळदार खेळाडू सज्ज झाले आहेत. शरीरसौष्ठवाचे ग्लॅमर प्रचंड वाढत असल्यामुळे उद्या मुंबई श्रीच्या प्राथमिक पेरीलाही प्रचंड गर्दी होणार असल्याचे भाकित संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. सिद्धेश कदम यांनी दिमाखदार स्पर्धा आयोजनासाठी पुढाकार घेतल्यामुळे स्पर्धा अत्यंत जोशपूर्ण वातावरण पार पडणार असून मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती मंचावर अवतरणार आहे. नऊ गटात होणाऱ्या या स्पर्धेत तब्बल 11 लाखांची रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहे. मुंबई श्रीचा मानकरी दीड लाखांचा तर उपविजेता 75 हजारांचा मानकरी ठरेल, मात्र आता या दोन पुरस्कारांसह तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूलाही 37.5 हजार रूपयांचे रोख इनाम उत्तेजनार्थ देणार असल्याचे सिद्धेश कदम यांनी जाहीर केले.
पुढील आठवड्यात होणाऱया महाराष्ट्र श्रीसाठी मुंबईची संघ निवडही याच स्पर्धेतून केली जाणार आहे. त्यासाठी सुनीत जाधव, सागर कातुर्डे, रोहित शेट्टी, सचिन डोंगरे, अतुल आंब्रे आणि रोहन धुरी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू अंतिम फेरीत उतरणार आहे. हे प्रत्यक्ष स्पर्धेत नसले तरी तयारीत असलेल्या या खेळाडूंची आखीवरेखीव देहयष्टी शरीरसौष्ठवप्रेमींना पाहायला मिळेल. बहुतांश खेळाडू मुंबई श्रीचे विजेते असल्यामुळे यंदाही एका नव्या विजेत्याला मुंबई श्रीचा बहुमान मिळणार आहे. स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू उतरणार असले तरी सर्वांच्या नजरा आशुतोष साहाकडे लागलेल्या असतील. या उदयोन्मुख खेळाडूने गेल्या दोन महिन्यात ज्यूनियर मुंबई श्री, ज्यूनियर महाराष्ट्र श्री आणि ज्यूनियर भारत श्री अशी अनोखी हॅटट्रीक साजरी केली आहे. तसेच सुजय पिळणकर, सौरभ साळुंखे, रोहन गुरव, सुशांत रांजणकर, दीपक तांबीटकर यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी माहिती शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली. फक्त 54 खेळाडूंमध्ये होणारा मुंबई श्री चा फैसला कांदिवली पूर्वेला ठाकूर संकुलात असलेल्या सेंट लॉरेन्स शाळेच्या पटांगणात लागेल.
मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबर फिजीक स्पोर्टस् प्रकारही रंगणार आहे. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् गटाला युवा खेळाडूंचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे या गटातून पाच खेळाडू अंतिम फेरीसाठी निवडताना रेफ्रीजना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे महिलांचाही उल्लेखनीय उपस्थिती फिजीक स्पोर्टस् गटात लाभणार असल्यामुळे यंदाची मुंबई श्री स्पर्धाही ग्लॅमरस आणि संस्मरणीय होणार हे निश्चित आहे.