Mumbai Siddhivinayak Temple closed: भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. दररोज सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. आपली सुख-दु:ख बाप्पाला सांगण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्याचं गाऱ्हाणं घालण्यासाठी तसेच आपल्या मनातली इच्छा किंवा पूर्ण झालेल्या इच्छांचे नवस फेडणयासाठी मोठ्या संख्येने भाविक सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. मुंबईकरांसह लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेले प्रभादेवीचे (Prabhadevi) सिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple) मंदिर पाच दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सिध्दिविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना तब्बल ५ दिवस घेता येणार नाहीये. १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाना दर्शनासाठी बंद (closed) राहणार आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यामुळे हे मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे येत्या १४ ते १८ डिसेंबर दरम्यान भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाला जाण्याचा विचार केला असेल, त्यांना त्यांचा प्लॅन बदलावा लागणार आहे. त्याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १९ डिसेंबरला दुपारपासून घेता येणार आहे. गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.