Join us

मुंबई- सिंधुदुर्ग विमानसेवेचे आरक्षण एका दिवसात फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई- सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग- मुंबई, अशी विमानसेवा एअर इंडियाकडून ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेची ऑनलाइन ...

मुंबई : मुंबई- सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग- मुंबई, अशी विमानसेवा एअर इंडियाकडून ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सेवेची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. मुंबई- सिंधुदुर्ग विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात १३ तारखेपर्यंत तिकीट आरक्षण फुल झाले आहे.

मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई, अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच या सेवेची जोरदार चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान सेवा दिली जाणार आहे.

मुंबई ते सिंधुदुर्गसाठी २, ५२० रुपये, तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी २,६२१ रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी १ वाजता चिपी येथे उतरेल, तर परतीचा प्रवास दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी सुरू होईल आणि विमान २ वाजून ५० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.