सायन...एक गाव, तीन किल्ले! पाहिलेत का? Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:24 AM2023-12-18T10:24:37+5:302023-12-18T10:29:35+5:30
सात बेटांची मुंबई आणि खाली साष्टी बेट यांच्या सीमेवरील एक गाव शीव.
संजीव साबडे,मुक्त पत्रकार :
सायन हे माहीम व वांद्रे, कुर्ला, हार्बर मार्गाचं किंग्ज सर्कल तसंच गुरू तेग बहादूर नगर, चेंबूर व चुनाभट्टी अशा सर्व भागाशी जोडलं गेलं आहे. जुना आग्रा रोड, मुंबई-नाशिक रोड आणि मुंबई-पुणे रोड या गावातून जातात...
मुंबईत पोर्तुगीज व ब्रिटिशांनी अनेक किल्ले बांधले. दारुगोळा साठवणं आणि समुद्र वा खाडीमार्गे येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवणं हा या किल्ल्यांचा उद्देश असणं स्वाभाविक आहे. सात बेटांची मुंबई आणि खाली साष्टी बेट यांच्या सीमेवर एक गाव होतं शीव. त्या गावात तीन किल्ले बांधण्यात आले.
एक किल्ला १६७० मध्ये, तर उरलेले दोन किल्ले १७३५ च्या दरम्यान. आज शीव स्टेशनजवळचा किल्ला उठून दिसतो, पण बाकीचे दोन म्हणजे, धारावीचा काळा किल्ला व रिवा किल्ला शोधूनही सापडत नाहीत. काळ्या दगडांच्या बांधकामामुळे त्यांना काळा किल्ला म्हटलं जायचं. काळा किल्ला धारावीत दडून गेला आहे, तर आयुर्वेदिक कॉलेज परिसरात रिवा किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत.
मुंबई व साष्टी बेटाच्या सीमेवरचं गाव म्हणून नाव शीव. शीवचं सियॉन आणि सायन झालं, असं म्हणतात. पोर्तुगीज राजवटीनं हे गाव धर्मगुरूंना सांभाळायला दिलं होतं. त्यांनी एक चर्च बांधलं. जेरुसलेममधील एका चर्चचं माऊंट झिऑन हे नाव त्याला दिलं. त्या झिऑनचं सिऑन व पुढे सायन झालं अशीही कथा आहे. खाडीला लागून असलेल्या शीवमध्ये कोळी राहत, मासेमारी करत. आगरी व भंडारीही खूप होते. आजचा धारावीचा जो भाग आहे, तिथं मासेमारी होई.
कोळी वस्ती व खाडी :
जो भाग सायन कोळीवाडा म्हणून ओळखला जातो, तिथंही कोळी वस्ती व खाडी होती आणि मासेमारीही होई. आज कोळीवाडा भागात पंजाबी वस्ती आहे, त्यांचं गुरुद्वारा आहे, धाबे आहेत आणि त्यात खास पंजाबी पद्धतीचे झिंगा कोळीवाडा, तंदूर मटण, चिकन व फिश हे प्रकार मिळतात आणि खास मिठाईची दुकानंही आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी :
आशियातील सर्वात मोठी धारावीची झोपडपट्टी सायनमध्ये आहे. त्यात चामड्याच्या वस्तू, लोणची, पापड, मसाले, मातीची भांडी, शिंपीकाम असे असंख्य उद्योग तिथं चालतात. भंगार उद्योगात कागद, प्लास्टिक, पत्रा याबरोबरच तेलाची रिकामी पिंप विकत घेऊन स्वच्छ करण्याचं कामही तिथं चालतं.
सर्व जाती, धर्म, प्रांत व भाषेचे लोक त्या झोपड्यात राहून हे उद्योग करतात. धारावीचं पुनर्वसन करताना उंच इमारती बांधल्या की यांना घरं नक्की मिळतील, पण उदरनिर्वाहासाठी जागा मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. सायन व धारावीत तमिळ लोक मोठ्या प्रमाणात राहतात. महापालिका, विधानसभेवर तेथून तामिळ भाषक निवडून येतो. स्थानिक तामिळ वृत्तपत्रही तिथून निघतं. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व कॉलेज तिथं आहेत.
सायनमध्ये पंजाबी व सिंधीही मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे त्यांचे खाद्यप्रकार मिळणारी रेस्टॉरंट्स व दुकानंही बरीच आहेत. दक्षिणी व तमिळ रेस्टॉरंट्ही अनेक आहेत. महापालिकेचं लोकमान्य टिळक रुग्णालयही आहे.
येथे पाहा व्हिडीओ :