मुंबई : बदलत्या जीवनशैलीत दारूचे व्यसन ही एक फॅशन झाली आहे. मात्र, या फॅशनचा हळुवारपणे सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते दारू हे व्यसन नव्हे, तर हा सामाजिक आजार आहे. उपचाराने हे व्यसन कमी करता येते.
दारूचे व्यसन हा आजार आहे. दीर्घकाळ चालणारा आजार. ज्याचे शरीरावरच नव्हे तर मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक असे परिणाम होतात. अशा व्यसनावर औषधांबरोबर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. उपचाराने नक्कीच व्यसनाधीनता कमी होऊ शकते. मात्र त्यासाठी कुटुंबासह सर्वांचे अनुकूल वातावरण हवे.- रमेश सांगळे, समन्वयक मिरॅकल फाउंडेशन, मुंबई
देशी दारूला मागणीदरवर्षीप्रमाणे याही वर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री झाली. यामध्ये विदेशी मद्य २२७ लाख लिटर, बियर २४४ लाख लिटर, वाईन सव्वाअकरा लाख लिटर आणि देशी दारू सर्वाधिक म्हणजे ३३२ लाख लिटर इतकी विकली गेली. एकूण सव्वाआठ कोटी लिटर दारू विक्री यंदा झाली. ही विक्री गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगते.
माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे. माझा संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाला. नवऱ्याने दारूसाठी पालिकेची नोकरी सोडली. आम्ही कर्जबाजारी झालो. उपचारासाठी पैसे नाहीत. मुलांचे शिक्षण रखडले आहे. आमचे जगणे कठीण झाले आहे.- एक व्यसनाधीन पुरुषाची पत्नी
दारूचा पहिला परिणाम अन्ननलिकेवर होतो. पुढे मग जठर, यकृत, किडनी यावर हळूहळू परिणाम दिसून येतो. नंतर मज्जासंस्थेवर परिणाम दिसतो. दारूची सवय जडते आणि पुढे जाऊन ब्रेनचे, लिव्हरच्या समस्या निर्माण होतात.- डॉ. मनोहर यादव, वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार
अल्कोहोलचा आरोग्यावर असा दुष्परिणाम होतो? हृदयरोग : शरीरात अल्कोहोलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकारासारखे आजार जडतात. प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. लिव्हर खराब होते : दारूचे व्यसन करणाऱ्या अनेक लोकांच्या लिव्हरवर परिणाम होऊन काहींचे लिव्हर खराब झाल्यामुळे मृत्यूही ओढवला आहे.