सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीतून मुंबईचे स्थान घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:04+5:302021-08-12T04:10:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यस्त विमानतळांच्या यादीत आघाडीवर असलेल्या मुंबईचे स्थान जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीतून घसरले आहे. देशातील ...

Mumbai slipped from the list of best airports | सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीतून मुंबईचे स्थान घसरले

सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीतून मुंबईचे स्थान घसरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : व्यस्त विमानतळांच्या यादीत आघाडीवर असलेल्या मुंबईचे स्थान जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळांच्या यादीतून घसरले आहे. देशातील केवळ चार विमानतळांना या यादीत स्थान मिळवण्यात यश आले आहे. विमानतळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या स्काय ट्रॅक्स या संस्थेच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू या विमानतळांना पहिल्या शंभरात स्थान राखता आले. मात्र, दिल्ली आणि हैदराबादवगळता इतरांना आपल्या क्रमवारीत सुधारणा करता आलेली नाही. गेल्यावर्षी ५२व्या स्थानावर असलेल्या मुंबईची ६५व्या स्थानावर घसरण झाली असून, बंगळुरूचे स्थान ६८ वरून ७१वर घसरले आहे. दिल्लीने मात्र कामगिरीत सुधारणा करीत ५० वरून ४५ वे स्थान पटकावले आहे. हैदराबादनेही ७१ वरून ६४ व्या स्थानी मजल मारली आहे.

दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक क्रमवारीत पहिला नंबर पटकावला आहे. गेल्यावर्षी हे विमानतळ तिसऱ्या स्थानी होते. टोकियोतील हॅनेडा विमानतळाने आपले दुसरे स्थान कायम राखले असून, गेल्यावर्षी पहिल्या स्थानावर असलेल्या सिंगापूरमधील चंगी विमानतळाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण कोरियातील इनचॉन आणि टोकियोतील नॅरिता विमानतळाचा पहिल्या पाचात समावेश आहे.

मुंबईच्या क्रमवारीत तब्बल १३ अंकांची घसरण झाल्यामुळे नव्या व्यवस्थापनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. प्रवासीसंख्या वाढविण्याबरोबरच अंतर्गत सुविधांत सुधारणा करून मानांकन सुधारण्याची कसरत त्यांना कोरोना संकटातही करावी लागणार आहे.

.............

निवड कशी होते

जगभरातील ५५० व्यस्त विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांनी त्या त्या विमानतळाला दिलेल्या मानांकनावरून क्रमवारी ठरविली जाते. वर्षातील सहा महिन्यांचा कालखंड त्यासाठी विचारात घेतला जातो. विमानतळावर आगमन-प्रस्थानावेळी देण्यात येणारी सुविधा, लगेज, सुशोभीकरण, शॉपिंग, सुरक्षा, इमिग्रेशनबाबत ग्राहकांना आलेले अनुभव यावरून ग्राहक पॉइंट्स देतात. १९९९ पासून स्काय ट्रॅक्स ही संस्था विमानतळांचे मूल्यांकन करते.

................

देशातील विमानतळांची जागतिक क्रमवारी

दिल्ली - ४५

हैदराबाद - ६४

मुंबई - ६५

बंगळुरू - ७१

Web Title: Mumbai slipped from the list of best airports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.