मुंबई चौथ्यावरून सातव्या स्थानावर, निकालात तीन टक्के घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:27 AM2019-05-29T06:27:08+5:302019-05-29T06:27:31+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे.
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली आहे. यंदा मुंबईचा एकूण निकाल ८३.८५ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८७.४४ टक्के इतका होता. मुंबईतून एकूण ३,१६,१०५ विद्यार्थ्यांपैकी २,६५,०४० विद्यार्थी पास झाले असून ३४,५४३ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन म्हणजेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदा एकूण निकालाच्या टक्केवारीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.०४ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.१० टक्के इतकी आहे. राज्याच्या निकालात मागील वर्षी चौथ्या स्थानावर असणारी मुंबई यंदा सातव्या स्थानावर आहे.
शाखानिहाय विज्ञान शाखेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८६.३२ इतकी आहे. कला शाखेत ७४.४१ टक्के, वाणिज्य शाखेत ८५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर व्होकेशनल अभ्यासक्रम घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८५.२८ इतकी आहे. यंदा एकूण निकालात झालेल्या घटीमुळे शाखानिहाय निकालातही घट झाली आहे.
मुंबई विभागात ठाणे, पालघर, रायगड, ग्रेटर मुंबई, मुंबई उपनगर १, मुंबई उपनगर २ या जिल्ह्यांचा समावेश होत असून मुंबई उपनगर २ च्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सगळ्यात जास्त म्हणजे ८५.२० टक्के इतकी आहे. त्याखालोखाल रायगड ८४.९७ टक्के आणि ठाणे ८४.६३ टक्के या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे. पालघर जिल्ह्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.०५ तर ग्रेटर मुंबई जिल्ह्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.८७ इतकी आहे.
तर दुसरीकडे यंदाच्या निकालात मुंबई विभागीय मंडळातसर्वाधिक तब्बल २,२१० विद्यार्थी हे नव्वदीपार असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाने जाहीर केली आहे.
>...म्हणून घसरला मुंबईचा टक्का
मुंबईच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ती अव्वल आलेल्या कोकण विभागापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. कोकणातील एकूण विद्यार्थीसंख्या ही मुंबईतील खाजगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या आसपास आहे.
खासगीरीत्या प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. ऐनवेळी परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या ही मुंबई विभागात मोठी असते. त्यामुळे मुंबईच्या निकालाचा टक्का घसरल्याची माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष शरद खंडागळे यांनी दिली.
>विज्ञान शाखेतून ९७.३८ टक्क्यांनी पास झालो. बारावीच्या निकालाकडे घरच्यांचे लक्ष लागले होते. निकालात मला चांगले टक्के मिळाल्याचे समजल्यावर माझ्यासह घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मला पुढील शिक्षण विदेशात घ्यायचे आहे.
- गौरव गोयल, सायन्स शाखा, आयआयटीन्स पेस इन्स्टिट्यूट
मला कॉमर्स शाखेमधून ७४ टक्के गुण मिळाले आहेत. मी आणि अनमोल दोघे जुळे भाऊ असून दोघेही चांगल्या गुणांनी पास झालो आहोत. घरामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तसेच नातेवाइकांसह हितचिंतकांचे फोन आणि मेजेस येत आहेत. पुढे बीएमएसमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. त्यानंतर एमबीए करणार आहे.
- आर्यन कश्यप, कॉमर्स शाखा, जयहिंद महाविद्यालय
कॉमर्स शाखेतून ८९ टक्के गुण मिळाले. घरामध्ये सर्व खूश आहेत. आम्हाला वाटले होते की, जरा जास्त टक्के मिळतील? पण आता जे गुण मिळालेत त्यात समाधानी असून पुढील परीक्षांमध्ये जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. मला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधून कॅपिटल मार्केटमध्ये बॅचलर व्हायचे आहे. तर माझा जुळा भाऊ जयहिंद महाविद्यालयातून बीबीआयचे शिक्षण घेणार आहे.
- श्रद्धा धरणे, कॉमर्स शाखा, जयहिंद महाविद्यालय
कला शाखेतून ९४.४५ टक्के गुण मिळाले. पहिल्यांदा निकाल बघताना आम्ही सर्व त्याकडे बघतच राहिलो. गुणांची बेरीज करीत होतो, कारण ९४ टक्के गुण येत होते. आम्हाला सुरुवातीला वाटत होते की, बेरीज तर चुकत नाही ना? निकालाची जेवढी संकेतस्थळे होती, तीही सर्व तपासून पाहिली. आई-बाबा मिठाई वाटपाच्या कामाला लागले होते. भविष्यात मानसशास्त्रामध्ये बीए करायचे आहे.
- किरण साळुंखे, कला शाखा, केळकर महाविद्यालय
कॉमर्स शाखेतून ९३.३८ टक्के गुण प्राप्त झाले. पूर्ण वर्षभर मन लावून अभ्यास केला होता. त्याचे फळ आता मिळाल्याने घरामध्ये खुशीचा माहोल आहे. अनेकांचे फोन, मेसेज येत होते. पुढे सीएसाठीचे शिक्षण घेण्याचा विचार आहे.
- विश्वा शाह, कॉमर्स शाखा, जयहिंद महाविद्यालय
सुरूवातीला निकालाची खूप भिती वाटत होती. पण निकाल ऐकल्यावर आनंद झाला. कारण जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा आनंद होता. माझ्या गुणांबाबत जास्त काही अपेक्षा नव्हत्या. मला ७९.३८ गुण मिळाले आहेत. त्यात मी समाधानी आहे.
- प्रांजली नाईक,
सी.के.टी महाविद्यालय,
पनवेल (कला शाखा )
मला फाईन आर्टस मध्ये करिअर करायचे आहे. त्यामुळे बारावीत किती गुण मिळतात, यावर माझ्या करिअरची दिशी अवलंबून होती. ७१.०७ गुण मिळाले. त्यामुळे मी आनंदी आहे. कारण मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात मला भरारी घेता येईल.
- अर्चिता मते,
साठे महाविद्यालय,
विलेपार्ले (कला शाखा)
>विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी
७५ % व पुढे विद्यार्थी 102552
प्रथम श्रेणी ६०% व पुढे 464047
द्वितीय श्रेणी ४५% व पुढे 603119
उत्तीर्ण श्रेणी ३५% व पुढे 51441
>जिल्हा एकूण विद्यार्थी ७५% व त्याहून अधिक एकूण उत्तीर्ण उत्तीर्ण %
ठाणे ९०४६१ ७८४३ ७६५५६ ८४.६३
रायगड ३०८०१ १२६० २६१७६ ८४.९७
पालघर ४२०३५ २३८४ ३४९१२ ८३.०५
ग्रेटर मुंबई ४१३०० ७०४१ ३३४०१ ८०. ८७
मुंबई उपनगर १ ७०४५२ १०२०० ५९०२० ८३.७७
मुंबई उपनगर २ ४१०५६ ५८१५ 3४९७८ ८५.२०