मुंबईचा वेग मंदावला; वाहतूककोंडीत जगातलं पहिलं शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 02:43 AM2019-06-06T02:43:39+5:302019-06-06T02:44:48+5:30
कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना ठरावीक वेळेच्या ६५ टक्के लागतो अधिक वेळ
मुंबई : मुंबई जगभरामध्ये वाहतूककोंडीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईकर प्रवासी आता मुंबई मेरी ‘जान’ऐवजी ‘जाम’ म्हणू लागले आहेत. जगभरातील महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूककोंडीचे सर्वेक्षण ‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’ यांनी केले. त्यानुसार मुंबई वाहतूककोंडीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
जगभरातील ५६ देशांचे सर्वेक्षण करण्यात आले. या ५६ देशांपैकी सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या ४०३ शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्या क्रमांकावर कोलंबिया या देशातील बोगोटा, तिसºया क्रमांकावर पेरू या देशातील लिमा आणि चौथ्या क्रमांकावर दिल्ली, पाचव्या क्रमांकावर रशिया देशातील मॉस्को शहराचा क्रमांक लागतो.
मुंबईतील प्रवाशांना कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी ठरावीक वेळेच्या ६५ टक्के अधिक वेळ लागतो. त्यामुळे मुंबईकर वाहतूककोंडीत अडकून इच्छित वेळेत पोहोचण्यास विलंब लागतो. कोलंबिया या देशातील बोगोटा येथे अंतर पार करण्यासाठी ६३ टक्के अधिक वेळ लागतो. पेरू या देशातील लिमा आणि दिल्ली येथे अंतर पार करण्यासाठी ठरावीक वेळेच्या ५८ टक्के अधिक वेळ लागतो. तर रशिया देशातील मॉस्कोमध्ये हा वेळ ५६ टक्के आहे.
२०१७ पेक्षा २०१८ मध्ये वेळ वाढली
‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१७’ या सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये ठरावीक अंतर पार करण्यासाठी ६६ टक्के अधिक वेळ लागत होता. मात्र २०१८ मध्ये ६६ वरून ६५ टक्के अधिक वेळ लागत असून जगात ही टक्केवारी सर्वाधिक आहे. तर दिल्लीची २०१७ मधील अंतर पार करण्याची ६२ टक्के होती. तर यंदा ५८ टक्के आहे.
वाहनांंच्या गर्दीत केली मुंबईची कोंडी
मुंबईमध्ये विविध कंपन्यांच्या खासगी गाड्या, टॅक्सी, खासगी कार यांची संख्या वाढल्याने मुंबईतील वाहतूककोंडी वाढली आहे. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी विलंब लागतो. मुंबईमधील सार्वजनिक वाहतुकीचा भाग कमी झाल्याने आणि हा भाग खासगी गाड्यांनी व्यापल्याने वाहतूककोंडीला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.
सार्वजिक वाहतुकीने पूर्वी ८० टक्के तर खासगी गाड्यांनी २० टक्के भाग व्यापलेला होता. मात्र आता मुंबईत खासगी गाड्यांनी ३५ ते ४० टक्के जागा व्यापली असून सार्वजनिक गाड्यांनी ६० ते ६५ टक्के जागा व्यापली आहे.