Join us

मुंबई पुन्हा भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या नोंदी झाल्या असून, मुंबईतदेखील पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला आहे. बुधवारी दिवसभर मुंबईत पाऊस पडला. पावसाचा वेग कमी असल्याने मुंबई विस्कळीत झाली नाही. मात्र संततधार पावसाने मुंबईचा वेग किंचित कमी झाला होता.

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक ते दोन दिवसांपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये पावसाची नोंद होते आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. पुढील २४ तासांतही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि मुंबईतदेखील पावसाचा जोर कायम राहणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस नोंदविण्यात येत आहे. १९ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

बुधवारी मुंबई शहरात ३२, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात १७ मिलीमीटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला. पाऊस कोसळत असतानाच सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. पाच ठिकाणी झाडे कोसळली.