Mumbai Vande Bharat Metro AC Local Train: मुंबईकरांना गारेगार आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर २३८ वंदे भारत श्रेणीतील वंदे मेट्रो लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी (MUTP) प्रकल्पांतर्गत २३८ वंदे मेट्रो (उपनगरी) लोकलच्या बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी असून, लवकरच या लोकल सेवेत येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नवीन वातानुकूलित लोकलच्या देखभालीसाठी मुंबईत दोन नव्या कारशेड उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकलच्या देखभालीसाठी डेपोच्या उभारणीला यापूर्वीच मंजूरी देखील मिळाली आहे. हे डेपो वंदे भारत तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीनेच बांधण्यात येणार आहेत. नवीन आधुनिक एसी लोकल या वंदे भारत मेट्रोच्या धर्तीवर बनवण्यात येणार आहेत. मुंबईत लवकरच दाखल होत असलेल्या एसी लोकल या वंदे भारत एक्सप्रेसच्या श्रेणीतील असतील.
रेल्वेला जवळपास २० हजार कोटींचा खर्च येणार
या नवीन अपग्रेडेड लोकलसाठी रेल्वेला जवळपास २० हजार कोटींचा खर्च येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. कालांतराने मुंबईतील सर्वच लोकल वातानुकूलित करण्याचे रेल्वेचे ध्येय आहे. ‘मेक इन इंडिया’ मार्गदर्शक तत्त्वांवर वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या वंदे भारत लोकलचे तिकीट दर एसी लोकलप्रमाणेच असल्याने सर्वसामान्यांचा लोकल प्रवास मात्र महागण्याची शक्यता आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही घोषणा केल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रेल्वेकडून सदर निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकलमधील बिघाड वाढताना दिसत असून, स्वयंचलित दरवाजे बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत श्रेणीतील या नवीन ट्रेन धावणार आहेत.