मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग
By मनोज गडनीस | Published: April 13, 2024 09:21 AM2024-04-13T09:21:42+5:302024-04-13T09:22:52+5:30
हमखास मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जोर लावला आहे.
मनोज गडनीस
मुंबई : नायगाव ते अणुशक्तीनगर व्हाया धारावी अशा विस्तीर्ण मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात एकगठ्ठा किंवा हमखास मतदान करणारे मतदार सध्या तेथील उमेदवारांच्या अजेंड्यावर प्राधान्यक्रमाने आहेत. धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग असे गणित आजतरी येथे आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे आणि उद्धवसेनेचे अनिल देसाई यांनी सध्या धारावी, सायन-कोळीवाडा, चेंबूर ॲन्टॉप हिल, प्रतीक्षानगर येथील वस्त्यांमध्ये प्रचाराचा जोर वाढविल्याचे चित्र आहे. माहिम व अणुशक्तीनगर या तुलनेने उच्च मध्यमवर्गीय भागातून अपेक्षित प्रमाणात मतदान झाले नव्हते. त्यामुळेच हमखास मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जोर लावला आहे.
मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
यापैकी धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा आणि चेंबूरमधील कनिष्ठ मध्यमवर्गीय विभागातून हमखास मतदानासाठी लोक घरातून बाहेर पडतात.
२०१९ मध्ये सरासरी ५५.२३ टक्के मतदानातील ६५ टक्के मतदान हे धारावी, सायन, कोळीवाडा, वडाळा, चेंबूरचे होते.
गुढीपाडवा, स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन, रमजान ईद आणि रविवारी असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिवस हे उमेदवारांच्या पथ्यावर पडले आहेत.
धारावीच्या विकासाची गुढी, प्रकट दिनाचा उत्सव आणि रमजान ईद या कार्यक्रमांचे दोन्ही प्रमुख पक्षांच्या समर्थकांकडून आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यानुसार आश्वासने देण्याकडे अर्थातच उमेदवारांचा कल आहे. माहिम, अणुशक्तीनगर परिसरात पोहोचण्याचेही नियोजन आहे.