संतोष आंधळेमुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याविरूद्ध लढण्यासाठी राेज नवे नाव समाेर येत आहे. त्यामुळे नेमका काेणाच्या नावाचा झेंडा हाती घ्यायचा हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. येथे मंत्री मंगल प्रभात लोढा किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा हाेती. भाजप कार्यकर्ते कामालाही लागले होते; पण आता शिंदेसेनेकडे हा मतदारसंघ जाणार आणि यशवंत जाधव किंवा मिलिंद देवरा यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार, या चर्चेने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
लोढा यांनी ‘मोदी मित्र’चा प्रयोग सुरू केला तर नार्वेकरांनी थेट दगडी चाळीलाच साद घातली. एकीकडे मोदी मित्र म्हणून लोढांचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करताहेत आणि दुसरीकडे नार्वेकर वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावताहेत. त्यामुळे भाजपाचे केडर सुखावले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाने उमेदवारीच्या चर्चेला खो बसला आहे. शिंदेसेना १६ जागा लढवणार असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. त्यामुळे मुंबईतील दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिम या दोन जागा त्यांच्याकडे जाणार, हे स्पष्ट झाले.
सध्या महायुतीकडून सर्वपक्षीय मित्र पक्षांच्या बैठकीचे आयोजन केले जात आहे. त्यात मतदारसंघातील विधानसभानिहाय जबाबदारी वाटून दिली जात आहे. या प्रक्रियेत शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सोडले, तर अजित पवार गट आणि मनसेचे कार्यकर्ते कार्यक्रमाला आलेले दिसत नाहीत.
मिलिंद देवरांचे नाव चर्चेत कसे आले? शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा यांचेच नाव निश्चित होईल, असे समजते. कारण देवरा यांना या आधीच्या दोन निवडणुकांत मुंबादेवी आणि भायखळा, या दोन विधानसभा मतदारसंघातून चांगले मतदान झालेले आहे. भाजपचा पाठिंबा आणि शिंदेसेनेचे प्रयत्न यामुळे उद्धवसेनेचे अरविंद सावंत यांच्यासमोर तेच तगडे आव्हान उभे करू शकतील, अशी चर्चा आहे.
अरविंद सावंतांच्या गाठीभेटी सुरूउद्धवसेनेच्या जनसंवाद आणि शाखा संवादाच्या माध्यमातून अरविंद सावंत यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडीचे संयुक्त मेळावेसुद्धा आयोजित केले जात आहेत.