मुंबई - मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. त्यातही, देशाच्या अर्थकारणाची सूत्रं मुंबईतील ज्या भागातून सांभाळली जातात, हलवली जातात त्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार, याबद्दल उत्सुकता असणं स्वाभाविकच आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही इथे शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात सामना होतोय.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 81,130 मतं मिळाली असून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या पारड्यात 53,743 मतं पडली आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण १४ लाख ८५ हजार, ८४६ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५१.४६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का जास्त आहे. ही मतं कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावं लागेल.
गेल्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी ३ लाख ७४ हजार ६०९ मतं मिळाली होती, तर मिलिंद देवरा यांना २ लाख ४६ हजार ०४५ मतं होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर ८४ हजार ७७३ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.