दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

By संतोष आंधळे | Published: June 5, 2024 09:30 AM2024-06-05T09:30:01+5:302024-06-05T09:38:17+5:30

Mumbai South Lok Sabha Election Result 2024 : मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.

mumbai south lok sabha election result 2024 arvind sawant hat trick in south mumbai constituency yamini jadhav lost maharashtra result  | दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

संतोष आंधळे, मुंबई :मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तिसऱ्यांदा सावंत लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपचे दोन प्रमुख नेते सोबत असतानासुद्धा शिंदे सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव पराभूत झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यासोबत काही महिन्यांपूर्वीच शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांची फार जादू या मतदारसंघामध्ये चालली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.      
  
या लोकसभा मतदारसंघात कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा मलबार हिल आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा या विधासभा मतदारसंघातून आमदार आहेत. जाधव यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी लोढा आणि नार्वेकर निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांनी त्यांच्या कामास सुरुवातही केली होती. कार्यकर्त्यांसोबत बैठकांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. नार्वेकर यांनी तर भायखळा येथे अखिल भारतीय सेनाप्रमुख अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठकही घेतली होती, तर लोढा यांनी दक्षिण मुंबईत विविध समाजांच्या बैठका घेतल्या होत्या. 

भाजप कार्यकर्त्यांत नाराजी-

१) अखेरच्या टप्प्यात जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काही प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, त्यानंतरसुद्धा लोढा यांनी झपाट्याने काम करण्यास सुरुवात केली होती. 

२) लोढा स्वतः आमदार असलेल्या मलबार हिल मतदारसंघात यामिनी जाधव यांच्या सोबत त्यांनी अनेक प्रचार सभांमध्ये हजेरी लावली होती. 

३) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीसुद्धा या मतदारसंघात हजेरी लावून जाधव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच शिंदेसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठविले होते. २००४ आणि २००९ मध्ये या मतदारसंघातून देवरा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याशिवाय त्यांचे वडील मुरली देवरा यांचाही या मतदारसंघावर वरचष्मा राहिलेला आहे. या मतदारसंघातून त्यांनी खासदार आणि केंद्रात कॅबिनेटमंत्री म्हणून काम केलेले आहे. मात्र, देवरा यांचा जाधव यांना मात्र फारसा फायदा झाला नाही. 

Web Title: mumbai south lok sabha election result 2024 arvind sawant hat trick in south mumbai constituency yamini jadhav lost maharashtra result 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.