जय गणेश! सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीसाठी खास व्यवस्था, मोफत बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:06 PM2024-06-23T20:06:09+5:302024-06-24T12:03:06+5:30
Mumbai News: येत्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे देण्यात आली.
श्रीकांत जाधव, मुंबई : येत्या मंगळवारच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेताना भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासा तर्फे देण्यात आली. तसेच सिद्धिविनायक अँपद्वारे 'श्री' च्या दर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
रविवारी सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत न्यासाच्या कार्यकारी अधिकारी वीणा मोरे - पाटील यांनी ही माहिती दिली. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र, २५ जून रोजी अंगारकी असल्याने लाखोंच्या संख्येने भाविका येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिर न्यासाने दर्शन व आरतीच्या वेळेत बदल केले आहेत. काकड आरती महापूजा मध्यरात्री १२.१० ते १. ३० वाजता होणार असून दीड वाजल्यापासून 'श्री' चे दर्शन भाविकांसाठी सुरू होणार आहे. अंगारकीला रात्री ९ ते १०. ४५ पर्यत गाभाऱ्यात महापूजा, नैवैध व आरती होणार आहे.
मोफत बससेवा-
दर्शनासाठी सर्वसामान्य रांग, स्त्रियांची रांग, मुखदर्शन आणि आशिर्वचन पूजेची रांग अशी व्यवस्था आहे. भाविकांसाठी दादर पश्चिम रेल्वे स्थानक ते रवींद्र नाट्य मंदिर अशी मोफत बस सेवा ठेवली आहे. तर आशिर्वचन रांगेची सुरूवात सिद्धी प्रवेशद्वार क्र- ३ येथून होईल, गाभाऱ्यातील दर्शनासाठी रचना संसद कॉलेज मंदिर प्रवेशद्वार क्र - ४ येथून आणि मुखदर्शनाची रांग एस.के.बोले आगरमार्ग बाजार मंदिर प्रवेशद्वार क्र- ७ येथून सुरूवात होणार आहे.
पार्किंग सुविधा-
वाहन पार्किंगसाठी क्राऊन मिल कंपाऊंड येथे मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंडप, विनामूल्य पादत्राणे, वैद्यकीय सुविधा, भाविकांसाठी विनामूल्य पाणी व चहा व्यवस्था करण्यात येणार आहे.