लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, ‘एकच टायगर’, ‘दादांचे नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन’, ‘भावी नगरसेवक, आमदार आणि खासदार’ अशा अनंत शब्दांनी भरलेले मोठमोठाले जाडजूड फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स मुंबई शहर आणि उपनगरात लावले जातात. मुंबई महापालिकेकडून यासाठी परवानगीदेखील घेतली जात नाही. वाढदिवस झाले, भाऊंची नियुक्ती झाली. कार्यक्रम झाले तरी हे बॅनर रस्तोरस्ती तसेच राहतात. याकडे मग पालिकाही लक्ष देत नाही आणि कार्यकर्तेही. मात्र असे जागोजागी लागलेले फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स मुंबई विद्रूप करीत आहेत. फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स लावण्यात स्पर्धादेखील असते. त्यामुळे मुंबईच्या विद्रूपीकरणात दिवसागणिक भरच पडत आहे.
फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स लावण्यात येऊ नयेत. असे केल्याने शहर विद्रूप होते, असा मुद्दा नेहमी मांडला जातो. मात्र मुंबई महापालिकेच्या नाकावर टिच्चून फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स लावले जातात. काही फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्ससाठी मुंबई महापालिकेकडून रीतसर परवानगी घेतली जाते. मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. उर्वरित फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स अशा फुकट्या जाहिराती जागोजागी पाहण्यास मिळतात. भूमिगत रस्ते, फ्लायओव्हरचे खांब, स्कायवॉक आणि खांब, झाडांची खोडे, नाके, रेल्वे स्थानकांसह बेस्ट डेपोचा परिसर, इमारतींचे प्रवेशद्वार, मंडळांची प्रवेशद्वारे अशा असंख्य ठिकाणी फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्सवर आपआपली जाहिरात फुकट केली जाते. मात्र अशा फुकट्या जाहिरातींनी मुंबईच्या विद्रूपीकरणात भर पडते.
बहुतांश फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्सवर राजकीय पक्षांनी केलेल्या कामांचे गोडवे गायलेले असतात. प्रत्यक्षात या कामांचा केवळ नारळ फुटलेला असतो. कामे पूर्ण झालेली नसतात. वाढदिवसाच्या बाबतीत दुसरा वाढदिवस आला तरी फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स तसाच असतो. अनोळखी व्यक्ती मग फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्सचा वापर झोपड्यांसह घरांसाठी किंवा दुकानांसाठी ताडपत्री म्हणून करतात. मात्र आपण लावलेला फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स आपण स्वत: काढण्याबाबत कोणीच उत्सुक नसल्याचे चित्र असते. परिणामी, मुंबई विद्रूप होते.
-----------
अनुज्ञापन विभाग परवानगी देतो
मुंबई महापालिकेचा अनुज्ञापन विभाग बॅनर लावण्यासाठी परवानगी देतो. जेव्हा अशी परवानगी मागितली जाते तेव्हा बॅनर कुठे लावणार? किती आकाराचा लावणार? कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत लावणार? ही सगळी माहिती द्यावी लागते. अशी माहिती दिल्यानंतर आणि रक्कम भरल्यानंतर महापालिका एक पावती देते. या पावतीवर सर्व तपशील असतो. तपशील असलेली पावती किंवा तत्सम माहिती लावण्यात आलेल्या बॅनरच्या खाली असणे गरजेचे असते. मात्र मुंबईतल्या बहुतांशी, बहुतांशी नाही तर अनेक बॅनरखाली असा तपशील आढळत नाही.
- अंकुश कुराडे, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वाभिमानी भारतीय पँथर
-----------
न्यायालयात धाव घेणार
फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स वा काहीही असो. ज्याने आपली मुंबई अस्वच्छ राहत असेल अशा गोष्टी करूच नयेत. उलटपक्षी फलक, होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स लावू नयेत; यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. मात्र आपल्याकडे चित्र उलटे आहे. परिणामी, मुंबईच्या विद्रूपीकरणात भर पडते. मी याबाबत न्यायालयात धाव घेणार आहे.
- शरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ता
-----------
डुलक्या नाहीत. प्रशासन कारवाई करते, पण...
जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात मुंबई महापालिकेकडून बॅनरबाजीची आकडेवारी प्राप्त झाली असून, बॅनर्समध्ये सर्वाधिक बॅनर्स हे राजकीय आहेत. बोर्डचा विचार करता सर्वाधिक बोर्ड्स हे सामाजिक आहेत. पोस्टर्सचा विचार करता सर्वाधिक पोस्टर्स हे सामाजिक आहेत. झेंड्यांचा विचार करता अशा झेंड्यांचा आकडा ७१८ आहे. अशा सगळ्या बॅनर्स, बोर्ड्स आणि पोस्टर्सचा आकडा ५ हजार ९४ असून, हा आकडा कारवाईचा आहे.
-----------
एकूण झालेली कारवाई
राजकीय : २ हजार ३३४
व्यावसायिक : ७००
सामाजिक : २ हजार ६०
एकूण : ५ हजार ९४
---------------
एकूण खटले : १०१
पोलीस ठाण्यात तक्रारी : ७४५
एफआयआर : ३७
---------------